पुणे

Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून साक्ष : ज्येष्ठाला कारावास

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल, असेही निकालात नमूद केले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. ही घटना 18 मे 2015 रोजी घडली. पीडिता सकाळी आठच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी रानात गेली होती.

या वेळी भोसुरे याने शेतातील पडीक जागेतील मंदिराजवळ तिला गोळ्या खायला देतो म्हणून जवळ बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली असल्याचे पीडितेच्या आईने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या असक्षम असल्याने तिला इनकॅमेरा काही प्रश्न विचारण्यात आले.

पीडित मुलीने खाणाखुणा आणि हातवारे करून तिच्यावर आरोपीने केलेल्या जबरदस्तीची कहाणी सांगितली. न्यायालयात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी हा गेली 8 वर्षे 11 महिने आणि 16 दिवसांपासून कारागृहात आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हेमचंद्र बी. खोपडे यांनी तपास केला. कोर्ट पैरवी कर्मचारी पोलिस हवालदार एस. बी. भागवत आणि पोलिस कॉन्स्टेबल म्हणून ज्ञानदेव सोनावणे तसेच कोर्ट पैरवी अंमलदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT