शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दुष्काळी समजल्या जाणार्या 12 गावांत तीव— पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यापैकी पाबळ, धामारी, केंदूर परिसरात शासनाच्या वतीने 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या टँकरमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाबळ, केंदूर, धामारी, कान्हुर मेसाई, शास्तबाद, मोराची चिंचोली, खैरेनगर, खैरवाडी परिसरात पाणीटंचाईची भीषण स्थिती आहे. ओढे, नाले कोरडे पडले आहेत. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागाला वरदान ठरलेला थिटेवाडी बंधारा देखील कोरडा पडल्याने या भागातील पाणी प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चार्यासाठी छावणी सुरू करण्याची मागणी होत होती.
संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना प्रस्ताव देण्यात आले. यापैकी पाबळ गावासाठी दिवसाला 6 टँकरद्वारे 26 खेपा व केंदूरला दिवसाला 4 टँकरद्वारे 12 खेपा व धामारीसाठी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे या गावांतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली गेली. परंतु, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शासनाने सुरू केलेल्या टँकरमुळे तीन गावांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पशुधनासाठी पाणी कमी पडत असून, अधिकचे टँकर प्रशासनाने या गावांना द्यावेत, अशी मागणी पाबळचे सरपंच सचिन वाबळे
यांनी केली.
हेही वाचा