Pune Seth Hirachand Nemchand Digambar Jain Boarding Land Deal
पुणे : पुण्यातील बहुचर्चित सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या (जैन बोर्डिंग) जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची माहिती गोखले कन्स्ट्रक्शनच्या वतीने मेलद्वारे देण्यात आली आहे. मात्र “जोपर्यंत जैन बोर्डिंगचे नाव परत लागत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी जैन बोर्डिंगला भेट दिली होती. त्यावेळी “हा व्यवहार रद्द होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर रविवारी रात्री गोखले कन्स्ट्रक्शनकडून मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले. मोहोळ यांनी विशाल गोखले यांना दिलेल्या सूचनेनंतर त्यांनी व्यवहारातून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन गोखले बिल्डर्सना हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली होती. त्यांनी त्या विनंतीला मान देत जैन बोर्डिंग ट्रस्टला मेलद्वारे कळवले आहे. या व्यवहारात दिलेले २३० कोटी रुपये परत करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यासंदर्भातील पत्राची प्रत माझ्याकडे आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
“गोखले यांनी व्यवहार रद्द करण्याचे पत्र दिले असले, तरी प्रत्यक्षात हा व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत आणि मालमत्तेवरचे ‘गोखले कन्स्ट्रक्शन’ हे नाव हटवून पुन्हा ‘जैन बोर्डिंग’ हे नाव लागेपर्यंत तसेच बोर्डिंग पूर्ववत सुरू होईपर्यंत लढा थांबणार नाही,” असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
“मुरलीधर मोहोळ यांना पत्र दिले म्हणून हा लढा संपणार नाही. व्यवहार संपूर्णपणे रद्द होण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. येत्या २८ तारखेला धर्मादाय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी होणार असून, त्यावेळी आम्ही हे पत्र त्यांना सादर करू,” असेही शेट्टी म्हणाले.
“या साडेतीन एकर जागेवर गोखले बिल्डरचे नाव हटवून जैन बोर्डिंगचे नाव लागेपर्यंत हा लढा सुरूच राहील. समाजातील कोणालाही या जागेतील एक इंचही देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.