पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या आत सुरू असलेले गोरखधंदे दररोज चव्हाट्यावर येत असताना तब्बल 21 वर्षांपासून धर्मादाय आयुक्तांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. संस्थाचालकांनी स्वतःच्या कुटुंबातच आर्थिक मोबदला वाटपाची सोय केली आहे. याचे मास्टरमाइंड पी. के. द्विवेदी आणि मिलिंद देशमुख असल्याचे पुरावे हाती आले आहेत. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीबद्दल समाजव्यवस्थेत आदराचे आणि विश्वासाचे स्थान असताना संस्थेच्या विश्वस्तांनी मात्र गोरखधंदे करून नावलौकिक पार धुळीस घातले आहे.
कारण, संस्थेचा प्रचार, प्रसार तसेच संस्थेच्या घटनेनुसार उद्देश पूर्ण व्हावा म्हणून संस्थेला स्वातंत्र्यापूर्वी जमीन, इमारती तसेच देणगी विविध लोकांनी तसेच तत्कालीन शासनाने दिले. देशभरात संस्थेच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. शिक्षण, आरोग्य, आदिवासी सेवा, प्रशासन, राजकीय धोरण, आर्थिक नियोजनासाठी आजीवन सदस्य जीवन अर्पण करीत असताना यामध्ये समाजसेवक, विचारवंत, अभ्यासक यांचा समावेश होता. त्यांनी आध्यात्मिक, राजकारण आणि रचनात्मक समाज, यासाठी संस्था काम करीत राहील म्हणून व्यवस्था केली.
मिलिंद देशमुख संस्थेत सक्रिय झाल्यापासून संस्थेचे व्यावसायिकीकरण सुरू झाले. त्यांनी अलाहबाद येथील पी. के. द्विवेदी यांना हाताशी घेऊन सम्पत्तीच्या वाटाघाटी आणि विल्हेवाट परस्पर लावण्याचा बेत आखला. 2003 मध्ये आत्मानंद मिश्रा यांनी जमीन विकताना कुठलीच कायदेशीर परवानगी घेतली नाही; म्हणून केलेला पत्रव्यवहार लपवून ठेवला जात आहे, असा आक्षेप घेतला. मात्र, त्यावर द्विवेदींनी ताशेरे ओढले. आता पी. के. द्विवेदी यांनी 2021 मध्ये संस्थेची 74 लाखांची जमीन 17 लाख रुपयांना विकून आत्मानंद मिश्रा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत धर्मादाय आयुक्तांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यात द्विवेदी व देशमुख पुन्हा यशस्वी झाले.
दिवंगत रमेशचंद्र नेवे यांच्या शिफारशीने प्रवीणकुमार राऊत हे संस्थेत आजीवन सदस्य झाल्यानंतर संस्थेच्या उद्देशाने काम करून मिलिंद देशमुख, पी. के. द्विवेदी यांची ध्येयधोरणे लक्षात ठेवून त्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात विश्वस्त बरखास्त प्रकरण दाखल केले. आत्मानंद मिश्रा यांच्यावर ज्याप्रकारे दबाव आणल्या गेला, त्यांचे मानधन थांबवले गेले. त्याचे सर्व पुरावे आणि डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू करून त्यांच्यामार्फत शिक्षण क्षेत्राऐवजी व्यावसायिक लोकांना संस्थेत घेणे, व्यवस्थापन मंडळावर सदस्य करून आर्थिक मोबदला फक्त देशमुख, दामोदर साहू आणि पी. के. द्विवेदी यांच्या कुटुंबाला करून घेणे याबाबतचे पुरावे धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून सदर प्रकरण सुरू झाले.
सामाजिक संस्थेत असणारी संस्थामाफियांची टोळी समाजात उजागर होत आहे. यासाठी धर्मादाय आयुक्त न्यायबाजूने न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. काल संस्थेच्या आरोपित पदाधिकार्यांना धर्मादाय आयुक्तांनी त्यांच्या न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे आमचे वकील अॅड. राजेश ठाकूर यांनी सांगितले.
– प्रवीणकुमार राऊत, हरकतदार
हेही वाचा