Pune Navale bridge Accident
पुणे / कात्रज: मद्यधुंद मर्सिडीजचालकाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू आणि ट्रेलरने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रविवारी कात्रज भागातील वंडर सिटीजवळ भरधाव आयसर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेला धडक दिल्याची घटना घडली. टेम्पोने महिलेला फरफटत नेले. अपघातांतर घटनास्थळी न थांबता टेम्पोचालक पसार झाला. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.
लहूबाई वाघमारे (वय 49, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. अपघातात आणखी एक दुचाकीस्वार महिला जखमी झाली आहे. प्रियंका राऊत (वय 33) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात राऊत यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (latest pune news)
अपघातानंतर पसार झालेला ट्रकचालक नीलेश चांदगुडे (वय 38, रा. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहूबाई यांची मुलगी प्रियांका असून, त्या दोघी महात्मा फुले मंडई येथून दुचाकीवरून जात होत्या. दुचाकी प्रियांका चालवत होत्या, तर लहूबाई वाघमारे या पाठीमागे बसल्या होत्या.
दुपारी दीडच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावरून नवले पुलाकडे निघाल्या होत्या. वंडर सिटीजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार लहूबाई यांना धडक दिली. टेम्पोचालक दुचाकीस्वार लहूबाई यांना 200 मीटर फरपटत नेले. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
गंभीर जखमी झालेल्या लहूबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ट्रेम्पोचालक चांदगुडे याला अटक करण्यात आली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
मुलीदेखत आईचा मृत्यू
आंबेगाव खुर्द परिसरातील वाघजाईनगर येथील रहिवासी लहूबाई वाघमारे या आपल्या मुलीसमवेत दुचाकीवरून महात्मा फुले भाजी मंडईकडे जात होत्या. कात्रज चौकातील वंडरसिटीजवळ दुभाजका जवळ त्यांचा अपघात झाला. यात लहूबाई यांना टेम्पोने फरफटत नेले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलीच्या डोळ्यादेखत जन्मदात्या आईचा मृत्यू झाला.
आणखी किती बळी जाणार?
अपघात झाल्यानंतर तेथे नागरिकांनी गर्दी केली. कात्रज बाह्यवळण मार्ग, तसेच तेथून काही अंतरावर असलेल्या मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. शनिवारी (दि. 3 मे) मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला होता. बाह्यवळण मार्ग धोकादायक झाला आहे. अवजड वाहने भरधाव वेगाने तेथून जातात. कात्रज भागात आणखी किती बळी जाणार, असा सवाल प्रत्यक्षदर्शी यांनी केला.
पुलाच्या कामाला विलंब; डायव्हर्जन धोकादायक
कात्रज पुलाच्या दुरुस्तीसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) तयार करण्यात आला होता. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. याच डायव्हर्जनजवळ हा अपघात घडला आहे. यामुळे या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.