

Pune Weather Update Today
पुणे: तब्बल 44 दिवस यंदा पुणे शहरात उष्णतेची लाट होती. कमाल तापमानाचा पारा प्रथमच रविवारी 4 मे रोजी 6 ते 8 अंशांनी खाली आल्याने पुणेकरांना प्रचंड उकाड्यातून किंचित हायसे वाटले. शहराचा पारा 41 ते 42 अंशांवरून 36 अंशांवर खाली आला होता.यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिना प्रखर उन्हाचा ठरला. त्यातही 10 मार्च ते 30 एप्रिल असे 51 दिवस उष्ण लहरी तीव्र होत्या.
त्यातही 44 दिवस खूप जास्त उष्मा पुणेकरांना सहन करावा लागल्याचे शास्त्रज्ञांचे आकडे सांगतात. दि. 10 मार्च ते 31 मार्च या कालावधीत शहराचा पारा सतत 39 ते 41 अंशांवर होता. एप्रिलमध्ये तर सलग 30 दिवस शिवाजीनगरचा पारा 40 ते 41 अंशांवर होता, तर लोहगाव 44 दिवस 42, तर 8 ते 10 दिवस 43 अंशांवर गेले होते. त्यामुळे शहरात एकूण उष्मा (टोटल हिट कंटेट) जास्त जाणवला. पुणेकरांनी इतका तीव्र उन्हाळा या आधी कधी अनुभवला नाही, असे जाणकार सांगत आहेत.
शिवाजीनगर 44 दिवसांनी आले 36 अंशांवर..
शहरातील शिवाजीनगर भागाचे कमाल तापमान प्रथमच 44 दिवसांनी 36.9 अंशांवर खाली आल्याची नोंद झाली, तर सलग 44 दिवस 42 अंशांपेक्षा जास्त तापमान असणार्या लोहगावचे तापमान 39.8 अंशांवर खाली आले होते. शहराचा पारा सुमारे 6 ते 8 अंशांनी खाली आल्याने रविवारची दुपार प्रथमच सुसह्य वाटली. घरात जो प्रखर उष्मा जाणवत होता, तो रविवारी 4 मे रोजी कमी झाला होता. (Latest Pune News)
रविवारचे शहराचे कमाल तापमान..
शिवाजीनगर 36.9
पाषाण 37.3
लोहगाव 39.8
चिंचवड 36.1
लवळे 35.4
मगरपट्टा 36.8
कोरेगाव पार्क 36.6
आंबेगाव 36.4
हडपसर 36
वडगाव शेरी 35.5
एनडीए 35.3
बालेवाडी 34.8
दापोडी 34.1
पुढील काही दिवस पुणे शहरासह राज्यात सर्वत्र दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील आणि मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे शहरात येत असल्याने तापमानात मोठी घट दिसत आहे. दुपारी क्युम्युनोलिंबस (पांढरे शुभ्र ढग) तयार होऊन सायंकाळी पाऊस पडेल. पुणे शहरात 5 मे पासून ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे