पुणे: उन्हाळी सुट्यांमध्ये रेल्वे स्थानकावर होणार्या गर्दीच्या नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर ‘स्वतंत्र कक्ष’ स्थापन केला आहे. हा कक्ष व्हीआयपी एन्ट्रीजवळ पार्सल विभागाशेजारी उभारला असून, त्या कक्षात प्रवाशांसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
उन्हाळी सुट्यांमुळे बाहेरगावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. स्थानकावर प्रवाशांना बसायला जागा राहिलेली नाही. त्यांना प्लॅटफॉर्म आणि परिसरातच भर उन्हात बसावे लागत आहे. याबाबत रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी दै. ‘पुढारी’मध्ये सातत्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात येत होती.
त्याची दखल घेत, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांनी रेल्वे स्थानकावर नुकतीच पाहणी केली. या वेळी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे अधिकार्यांसोबत, मुख्यालयातील अधिकारी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहेरा आणि अन्य उपस्थित होते. त्या पाहणीनंतर वर्मा यांनी रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे नियोजन केले होते. आता हा ‘स्वतंत्र कक्ष’ पुणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आला आहे.
...या ठिकाणी धावणार विशेष गाड्या
पुणे विभागातून पुणे-दानापूर, पुणे- गाझीपेठ सिटी, कोल्हापूर- कटियार, दौंड-सोलापूर- कोल्हापूर, पुणे- हरंगुळ आणि पुणे- नागपूरदरम्यान उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा रेल्वे प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे विभागात विशेष गाड्यांच्या 576 फेर्या
रेल्वेच्या पुणे विभागाकडून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, 18 उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्या पुढील अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत धावणार असून, त्यांच्या एकूण 576 फेर्या होणार आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी कसरत करावी लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रेल्वे पुणे विभाग कायमच प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी कटिबद्ध असतो. यानुसारच उन्हाळी गर्दी नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही रेल्वे प्रवाशांसाठी हा होल्डिंग एरिया (स्वतंत्र कक्ष) बनवला आहे. येथे प्रवाशांना आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.- हेमंत कुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग