गणेश खळदकर
पुणे : कायद्याचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला नव्या रोजगार संधी तर मिळतातच; मात्र या क्षेत्राद्वारे सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासह समाजसेवा करण्याची संधी लाभते. त्यामुळे तरुणांबरोबरच ज्येष्ठांमध्येही विधी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आकर्षण आहे. मागील तीन वर्षांमध्ये वयाच्या साठीतील तब्बल सव्वाशे विद्यार्थ्यांनी आणि सत्तरीतील 9, तर वयाची 83 वर्षे पूर्ण केलेल्या एका विद्यार्थ्याने तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्याचे सीईटी सेलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सरकारी कामकाजापुरत्या मर्यादित असलेल्या विधी क्षेत्रात आता अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, कायद्याचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागांवर शतप्रतिशत प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आता कायद्याचा अभ्यास केलेली व्यक्ती गरजेची असते. त्यामुळे विधी क्षेत्राचा विस्तार वाढत असून, विद्यार्थ्यांची मागणीही दिवसागणिक वाढत आहे.
या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाल्यामुळे विधी अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांपासून प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे.
यामध्ये वय कितीही वाढले, तरी एक आवड म्हणून विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे तसेच पाच वर्षे अशा दोन स्वरूपांमध्ये विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
‘विधी’च्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधीच संधी
सिव्हिल, क्रिमिनल, कामगार, कंपनीविषयक कायदे, करविषयक प्रकरणे, आंतरराष्ट्रीय व्यवहार, ग््रााहक हक्क संबंधांवर कायदे, को-ऑप. सोसायटी, ट्रस्ट कायदे, वन व पर्यावरणविषयक कायदे, कौटुंबिक कायदे, मेडिको लीगल कायदे, परिवहन अपघात ट्रिब्युनल्स, पेटंट्स मिळवून देणारे व हक्क अबाधित राखणारे, अशी अनेक क्षेत्रे कायदा पदवीधरांना खुणावत आहेत. डिपार्टमेंट ऑफ आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलिस सेवा, सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ता, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ आदी क्षेत्रांतही वकील अथवा सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे.
बँकेतून वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून निवृत्त होण्याच्या अगोदर संविधानाशी निगडित विविध साहित्य वाचत होतो. त्या त्या काळातील घटनांचा अन्वयार्थ लावत सहकाऱ्यांशी चर्चा करीत होतो. तेव्हाच इतरांकडून मी लॉ करावे, असे सुचविले जात होते. मलाही तसे वाटत होते. अलीकडील काळात आलेल्या अनेक ज्युडिसिअरी निर्णयांची संविधानिक पातळीवर तर्कसुसंगतता लागत नव्हती. त्यामुळे आपण आता लॉचा अभ्यास करायचा, असे ठरवून लॉ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तीन वर्षांपूर्वी म्हणजे एलएलबी (74 टक्के) आणि वयाच्या पंचहत्तरीत एलएलएम (ए+ग्रेड) पूर्ण करीत डिग्री मिळवली.भागवत भालशंकर, विधी अभ्यासक्रम पूर्ण करणारे ज्येष्ठ विद्यार्थी