पुणे: राज्यातील यंदाच्या 2024-25 मधील गाळप हंगामात देय असलेल्या शेतकर्यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीचे सुमारे 116 कोटी रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांनी पाच साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्यांना कारवाईसाठी प्राधिकृत केलेले आहे.
जप्तीचे आदेश लागू झालेल्यांमध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, श्री सिद्धेश्वर सहकारी, अवताडे शुगर्स लिमिटेड या सोलापूर जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
बीडमधील माजलगाव येथील जय महेश एनएसएल शुगर आणि अहिल्यानगरमधील गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. या कारखान्यांचा समावेश आहे. नुकतीच आयुक्तालयात अशी सुनावणी साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांच्यासमोर झाली. या वेळी साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी व सहसंचालक (अर्थ) अविनाश देशमुख आणि संबंधित कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.