पुणे

Pune News : पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घराभोवती तगडा बंदोबस्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सोमवारी राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. बीड, सोलापूर, यवतमाळ परिसरात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर निदर्शने करण्यात आली. यापार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

समाजमाध्यमातून प्रसारित केल्या जाणार्‍या मजकुरांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या सुमारे 200 ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवली आहे. समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच शहरातून जाणार्‍या प्रमुख महामार्गांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी मागील सात दिवसांपासून जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जात आहे. मात्र, सोमवारी बीड जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान मंगळवारी सकाळी पुण्यातील नवले पूल परिसरात आंदोलकांनी आंदोलन करत रस्ता अडविला.

या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी खबरदारी घेतली असून, शहरातील मंत्री, आमदार आणि खासदारांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पुण्यातील नवले बि—ज हा मुंबई-बंगळुरू महामार्गावर आहे. येथून दररोज हजारो वाहने शहरात येतात. त्याच ठिकाणी आज आंदोलन झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी पुण्यातून जाणार्‍या चारही मार्गांवर बंदोबस्त ठेवला आहे. पुणे-सातारा, पुणे-मुंबई तसेच पुणे- नगर व पुणे सोलापूर अशा चार मार्गांवर अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी वकिलांचा मोर्चा

मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी वकीलवर्गाच्या वतीने बुधवारी (दि. 2) दुपारी 2 वाजता मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते लालमहाल असा हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व वकीलवर्गाने शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक चार येथे उपस्थित राहावे, असे आवाहन शहरातील वकिलांच्या वतीने करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गावरदेखील गस्त वाढविण्यात आली असून, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. आंदोलकांना आवाहन आहे की, त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

– रितेश कुमार,
पोलिस आयुक्त, पुणे शहर.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT