Law Pudhari
पुणे

Savarkar Defamation Case: सावरकर मानहानी प्रकरणात सात्यकी सावरकरांचे न्यायालयात महत्त्वाचे विधान

अंदमानातील क्रांतिकारकांबाबत न्यायालयात भूमिका; पुढील सुनावणी 29 एप्रिल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अंदमान कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबर काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या 568 क्रांतिकारींनी हालअपेष्टा सहन केल्या. यामध्ये, काहींचा मृत्यू झाला. ते सर्व माझ्यासाठी समान असून, मला त्यांच्याविषयी आदर आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दिली. काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान काही क्रांतिकारकांचा अंदमानच्या कारागृहातच मृत्यू झाल्यामुळे त्यांना देखील स्वातंत्र्यवीर म्हणता येईल का? या बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

लंडन येथील अनिवासी भारतीयांसमोर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील एमपीएमएलए या विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सध्या फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी सुरू आहे. बचावपक्षातर्फे ॲड. मिलिंद पवार हे उलटतपासणी घेत असून, यादरम्यान त्यांनी विविध तांत्रिक मुद्द्‌‍यांवर प्रश्न उपस्थित केले.

उलटतपासणी करताना ॲड. पवार यांनी, स्वातंत्र्यसंग््राामात योगदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना ‌‘स्वातंत्र्यवीर‌’ म्हणणे योग्य ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सावरकर यांनी, सशस्त्र व निशस्त्र अशा दोन्ही प्रकारचे क्रांतिकारक होते, असे सांगत, ‌‘महात्मा‌’ ही उपाधी मोहनदास करमचंद गांधी यांना जनतेने दिली.

चळवळीत सामील झालेल्या निशस्त्र क्रांतिकारकांना ‌‘महात्मा‌’ म्हटले गेले नाही. तसेच आझाद हिंद सेनेत सामील झालेल्या सर्व सैनिकांना ‌‘नेताजी‌’ म्हटले जात नाही. त्याचप्रमाणे जनतेने उत्स्फूर्तपणे ‌‘स्वातंत्र्यवीर‌’ ही उपाधी वि. दा. सावरकर यांना दिली. त्यामुळे कुठल्याही क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कमी होत नाही. अंदमानमधील इतर क्रांतिकारकांना ‌‘स्वातंत्र्यवीर‌’ न म्हणणे हे समानतेच्या विरोधात आहे का, या उपप्रश्नावर त्यांनी, माझ्या दृष्टीने सर्वच क्रांतिकारक समान असून त्यांच्याविषयी आदर आहे.

त्यामुळे कोणालाही महात्मा, स्वातंत्र्यवीर, लोकमान्य किंवा क्रांतिवीर म्हणण्यास माझा आक्षेप नाही, असे स्पष्ट केले. तसेच, स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, वि. रा. शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळे सर्व समाजघटकांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. हेही फिर्यादी सात्यकी यांनी मान्य केले. या खटल्यात ॲड. मिलिंद पवार यांना ॲड. योगेश पवार, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड. सुयोग गायकवाड आणि ॲड. हर्षवर्धन पवार हे सहकार्य करीत आहेत. पुढील सुनावणी दि 29 एप्रिल रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT