अमृत भांडवलकर
सासवड: सासवड शहरासह ग्रामीण भागात तरुण व किशोरवयीन मुलांचे गट गुन्हेगारीकडे वळल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. शहर आणि परिसरात दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध नावांनी टोळ्या स्थापन झाल्याची चर्चा आहे. त्यातून सासवड शहरात हाणामारी, दहशत निर्माण करणे, खंडणीसदृश प्रकार आणि संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे नागरिक सांगतात.
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयटी पार्क आणि औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहराचा वेगाने विस्तार होत आहे. यातून काही भागांत अनधिकृत वसाहतींचे प्रमाण वाढले आहे.
कोंढवा-पुणे मार्गावरील हिवरे रस्त्यालगत उभी राहिलेली खंडोबानगर वसाहत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीवर परिणाम होत आहे. विशेषतः अल्पवयीन आणि तरुण मुलांचा अशा गटांमध्ये सहभाग वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या मते, अवैध वसाहतीत मूलभूत सुविधांचा अभाव, बेरोजगारी आणि सामाजिक नियंत्रणाची कमतरता यामुळे काही समाजविघातक प्रवृत्तींना पोषक वातावरण मिळते. परिणामी परिसरात वारंवार भांडणे, दहशतीचे प्रकार आणि किरकोळ गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रारी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती व समुपदेशन करावे. तसेच अनधिकृत वसाहतींच्या प्रश्नावर ठोस धोरण आखावे, अशी मागणी होत आहे. सासवडच्या विकासाला गुन्हेगारीचे ग्रहण लागू नये, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.