निखिल जगताप :
बेलसर (पुणे ) :
आज पंढरीची वारी
आली आमुच्या दारी
आम्ही झालो वारकरी
ज्ञानोबाचे…!
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवारी (दि. 14) दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून पुरंदरमधील सासवड मुक्कामी येणार आहे. पालखी सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी सासवडनगरी सज्ज झाली आहे. पालखी दोन दिवस सासवडमध्ये मुक्कामी असल्याने हा सोहळा मोठी यात्रा भरल्याप्रमाणे साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या आगमनाकडे पुरंदर तालुक्यातील सारी जनता आस लाऊन बसली आहे.
सासवडमध्ये पालखी सोहळ्यात मोठा उत्साह पाहावयास मिळतो. मुकामाचा संपुर्ण परिसर हा नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ करण्यात आला आहे. रंगरंगोटी करून पालखी मैदान परिसर सुशोभित करण्यात आला आहे. त्यावर विविध कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत. विविध रेखाटनांमधून स्वच्छता, आरोग्य, कला, क्रीडा व इतर सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. स्वागतकमानी व भिंतींवर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग लिहिण्यात आले आहेत. तर पालखीतळ रस्त्याच्या (हाडको रोड) दोन्ही बाजूंना रंगीत लाइटच्या माळांनी सजावट केली असल्याने रस्ते बोलके झाले आहेत.
दिवे घाटातील नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी भाविक दिवे घाटात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. दिवे घाट चढून आल्यावर सासवडमध्ये प्रवेश होतो. सासवडमध्ये विविध बॅनर, स्वागताच्या आगमनानिमित्त स्वागतकक्ष, अन्नदानासाठी अन्नछत्र उभारण्यात आले आहेत. पालखी दोन दिवस सासवड मध्ये मुक्कामी असल्याने तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे खेळणी, खाद्य पदार्थ व इतर छोटी-मोठी दुकाने बाजारपेठेत सजली आहेत. त्यामुळे सासवडनगरीला यात्रेचे स्वरुप आले आहे.
पालखी तळावर 24 तास दर्शन घेण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नियंत्रण कक्षाजवळ एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तंबूतील नित्यक्रम, पहाटेची महापूजा, आरती, पादुकांचे 24 तास दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांचा व पुरंदरकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. स्वागतकक्षाच्या माध्यमातून जमेल तशी सेवा करण्यासाठी पुरंदरचे भाविक जय्यत तयारीत आहेत.
हे ही वाचा :