Saswad Power Crisis Pudhari
पुणे

Saswad Power Crisis: सासवडला विजेचा लपंडाव

सात दिवसांपासून विस्कळीत वीजपुरवठा; मोबाईल नेटवर्क ठप्प, ऑनलाइन आणि बँकिंग व्यवहार ठप्प, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

सासवड : सासवड शहर आणि ग्रामीण भागात वीजपुरवठा गेल्या पाच ते सात दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. रात्री-अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होतो. तसेच बहुतांश भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज गायब झाल्याने बहुतांश मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कही ठप्प होते. त्यामुळे ऑनलाइन, बँकिंग व्यवहारासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही फटका बसतो आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

पुरंदरच्या ग्रामीण भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विजेच्या सततच्या हुलकावणीने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांचा हंगाम हातातून जाण्याची भीती आहे. यंदा नदी, नाले, विहिरीत मुबलक जलसाठा आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अतिवृष्टीने पिके उद्ध्‌‍वस्त झाली. संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. उत्पन्नात घट झाल्याने त्यात आणखी भर पडली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने आता रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त आहे

महावितरणकडून अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची कामांसाठी शटडाऊन घेतले जाते. तर ग्रामीण भागात नियमित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी आठवड्यातून एक दिवस बत्ती गुल असते. त्यानंतरही सातत्याने वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. शीतपेयही खराब होत आहेत. पिठाची गिरणी, मसाला गिरण्या, इस्त्री व लॉन्ड्री व्यावसायिकांनाही फटका बसतो आहे.

मोबाईल नेटवर्क गुल बहुतांश मोबाईल टॉवरला इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सोय नसते. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्यास मोबाईल नेटवर्कही गायब होते. याचा फटका बँक, प्रशासनाचे सुविधा केंद्र, सेतू सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्राला बसत आहे. नेटवर्क सेवा बंद असल्यास सरकारी कामे रखडतात. कागदपत्रे, दाखले घेण्यासाठी आलेले नागरिक व विद्यार्थ्यांना खोळंबून राहावे लागते.

महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजून शेतकरी त्रस्त झाले. कृषिपंपासाठी वीजपुरवठा मिळावा यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. बंद पडलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शेतकरी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारतात. मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. काही शेतकऱ्यांना मागणी करूनही वीजपुरवठा मिळालेला नाही. या प्रकारामुळे त्रस्त झाले आहे.
नवनाथ कामठे, शेतकरी, चांबळी
आठवड्यातून एक दिवस देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ठराविक वेळेसाठी वीज बंद असते. महावितरणचे कर्मचारी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करतात. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेत आहे.
भालचंद्र गवई, कार्यकारी अभियंता, महावितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT