शिवदास शितोळे
परिंचे : पुरंदर तालुक्यातील सासवड परिसरात अवैध व्यावसायिक व बेकायदेशीर खासगी सावकार वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच सासवड पोलिस ठाण्यामध्ये अनेक राजकीय पदाधिकारी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या धनदांडग्यांचा वावर चिंताजनक ठरत आहे. (Latest Pune News)
पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी अनेक तास तक्रारदार थांबलेले असतात; मात्र, राजकीय पदाधिकारी किंवा अवैध व्यवसाय करणारे धनदांडगे आल्यानंतर त्यांना लगेच प्रवेश दिला जातो. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना तक्रारीसाठी उशीर करावा लागतो आणि त्रस्त होतो. काही ठिकाणी महिलांचा विनयभंग झाल्याने गुन्हा दाखल झाला तरी आरोपी गावात मोकाट फिरत असल्याचे आणि पोलिस प्रशासनाकडून त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तसेच, शाळेतील अल्पवयीन मुलींची छेड काढल्यावरही आरोपींना अर्थपूर्ण लुटूपुटू फटके देऊन सोडण्यात येणे, हा गंभीर प्रश्न आहे. यामुळे भविष्यात मोठे गुन्हेगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड परिसरातील कोठेही अवैध व्यवसाय किंवा बेकायदेशीर सावकारकी चालू असेल तर नागरिकांनी आम्हाला त्वरित माहिती द्यावी. त्यांच्या नावांची पूर्ण गुप्तता राखली जाईल. तसेच अवैध व्यवसाय करणारे आणि खासगी सावकार यांचा पूर्ण बीमोड करण्यासाठी आम्ही पथक तयार करत आहोत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कोणालाही न घाबरता वैयक्तिक मोबाईल क्रमांक 9764455555 वर संपर्क साधावा.राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलिस अधिकारी, भोर