सासवड: पुरंदर तालुक्याचे राजकीय केंद्र असलेल्या सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सत्तेवर आपले वर्चस्व कायम राखले असले, तरी शिवसेनेने केलेली लक्षणीय वाढ ही भाजपसाठी भविष्यातील राजकीय आव्हान ठरणारी आहे. नगराध्यक्षपदावर भाजपच्या आनंदीकाकी चंद्रकांत जगताप यांनी विजय मिळवला, तर नगरसेवक संख्येत शिवसेनेने थेट 2 वरून 9 जागांपर्यंत मजल मारत सासवडच्या राजकारणात मोठी मुसंडी मारली आहे.
नगराध्यक्षपदाचा चुरशीचा सामना नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत भाजपच्या आनंदीकाकी चंद्रकांत जगताप यांना 11 हजार 362 मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सचिन भोगळे यांना 10 हजार 271 मते मिळाली. अवघ्या 1 हजार 91 मतांनी सचिन भोगळे यांचा पराभव झाला. कमी मतांचा फरक पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचे स्पष्ट झाले.
संजय जगताप यांची प्रतिष्ठा पणाला
काँग््रेासमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय जगताप यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष सासवडकडे लागले होते. भाजपने नगराध्यक्षपदासह 13 नगरसेवक निवडून आणत नगरपरिषद आपल्या ताब्यात ठेवली, मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले.
विजय शिवतारे यांचा प्रभाव
शिवसेनेची वाढती ताकद पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचा परिणाम थेट निकालात दिसून आला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत केवळ 2 नगरसेवक असलेल्या शिवसेनेने या वेळी तब्बल 9 नगरसेवक निवडून आणले. हा निकाल भाजपच्या पारंपरिक वर्चस्वाला दिलेला राजकीय इशारा मानला जात आहे. सासवड नगरपरिषद नगराध्यक्ष भाजप आनंदीकाकी चंद्रकांत जगताप (11,362) विजयी.
प्रभागनिहाय विजयी नगरसेवक आकडेवारी पुढीलप्रमाणे : भाजपचे- मनोहर ज्ञानोबा जगताप (1112), लीना सौरभ वढणे (754), शीतल प्रवीण भोंडे (1013), ज्ञानेश्वर गुलाबराव जगताप (1069), सोपान एकनाथ रणपिसे (1444), स्मिता सुहास जगताप (बिनविरोध), अर्चना चंद्रशेखर जगताप (1455), राजन चंद्रशेखर जगताप (1490), स्मिता उमेश जगताप (1459), प्रदीप काशिनाथ राऊत (684), प्रियंका साकेत जगताप (938), ज्ञानेश्वर साधू गिरमे(936), अजित काळुराम जगताप (1666) विजयी झाले. शिवसेनेचे माधुरी तेजस राऊत (1209), बाळासाहेब बापूराव भिंताडे (755), रत्ना अमोल म्हेत्रे (1521), मंदार विजय गिरमे (1627), वैभव (राजाभाऊ) बबनराव टकले (1271), प्रितम सुधाकर म्हेत्रे (972), दीपाली अक्षराज जगताप (934), शिल्पा संदीप जगताप (954) आणि हेमलता मिलिंद इनामके (बिनविरोध) विजयी झाले.
जनतेचा प्रेमाचा विजय
हा विजय जनतेच्या प्रेमाचा आहे. सासवड नगरपरिषद यापूर्वी एक नंबर होती आणि पुढेही एक नंबरच राहील. सासवडकरांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असे मत नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप यांनी व्यक्त केले. मा. आ संजय जगताप यांनी मतदारांचे आभार मानत, सर्व विरोधक एकत्र असूनही जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याचे सांगितले.
राजकीय अर्थ आणि संदेश
या निवडणुकीत भाजप सत्तेवर कायम राहिला असला, तरी शिवसेनेची वाढती ताकद भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. सासवडचा निकाल हा भाजपसाठी विजयासोबत इशारा, तर शिवसेनेसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.