सासवड : पुरंदर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवड नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. सर्वच माजी नगरसेवक व इच्छुक नगरसेवक होण्यासाठी सरसावले आहेत. काहींनी तर यंदा नावापुढे नगरसेवकपद लागलेच पाहिजे असा चंग बांधून मोठ्या प्रमाणात खर्चाची तयारी केली आहे.(Latest Pune News)
सासवड नगरपालिकेत यंदा 11 प्रभाग आहेत. नगराध्यक्ष आणि 22 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालिका निवडणुका वेळेत न झाल्याने जवळजवळ एक टर्म वाया गेली आहे. त्यामुळे इच्छुकांची अजून काही काळ थांबण्याची तयारी नाही. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
कोणत्याही स्थितीत नावापुढे नगरसेवकपद लावण्यासाठी अनेकांनी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी अनेकांनी मोठा खर्च करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. तसा संदेश देणारे पोस्ट सोशल मीडिया व फ्लेक्सद्वारे झळकविले जात आहेत. भावी नगरसेवक, भावी जनसेवक, यंदा दादाच, अण्णा, भाऊ, तात्या, अक्का, ताई.... असे लेबल असलेले फ्लेक्स प्रभागात लावले जात आहेत.
नगरसेवक असल्यास शहरात मोठा मानसन्मान मिळतो. सहसा नगरसेवकाला सोडून कोणते कार्यक्रम घेतले जात नाहीत. नगरसेवकांभोवती नेहमी कार्यकत्यांचा गराडा असतो. मिळणारा मानसन्मान तसेच, नावलौकिकामुळे नगरसेवक पदाला मोठे वलय निर्माण झाले आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने लढती अटीतटीच्या होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेकांनी मतदारांना खुश करण्यासाठी खर्चाचा सपाटा लावला आहे.
सोशल मीडियाद्वारे मतदारांना जनजागृतीपर एसएमएस पाठविणे, वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन, देवदर्शन तसेच पर्यटन स्थळी सहलींचे आयोजन केले जात आहे. काही इच्छुकांनी यासाठी इव्हेंट एजन्सीची नेमणूक केली आहे.