सासवड : सासवड शहरातील बाजारपेठेतील पाच दुकानांत चोरी करून 3 लाख 36 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली. एकाच रात्रीत पाच दुकाने फोडल्याने सासवड येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.(Latest Pune News)
चोरट्यांनी शहरातील ओंकार निगडे यांचे शुज, आरूण मगर यांची बेकरी, मंगेश काकडे यांची मोबाईल शॉपी, किरण जगताप यांचे फॉशन दुकान, महेश भिंताडे यांची मोबाईल शॉपी या दुकांनाना लक्ष्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगडे यांच्या शूज दुकान चोरट्यांनी सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास फोडले. तेथून त्यांनी विविध कंपन्यांचे सुमारे 1 लाख 20 हजाराचे शूज चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरीवेळी दोघे बाहेर थांबल्याची माहिती आहे. सर्वच चोरट्यांनी आपल्या तोंडाला रूमाल बांधून आत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.
त्यानंतर चोरट्यांनी आरुण मगर यांच्या बेकरीतून 1 लाख 32 हजारांची रोख रक्कम चोरली. येथून मंगेश काकडे यांच्या मोबाईल शॉपीतून 32 हजार 500 रुपयांची चोरी केली. त्यानंतर किरण जगताप यांच्या फॉशन दुकानातून 12 हजरांचा मोबाईल चोरी केला. महेश भिंताडे यांच्या मोबाईल शॉपीतून 40 हजाराचे मोबाईल चोरून चोरट्यांनी पोबारा केला.
या सर्व चोरीच्या घटना सकाळी सात वाजता घटना उघडकीस आल्या. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंग गौर, पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे व पथकाने पंचानामा केला.