पुणे: राज्यभरातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेल्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या खाटा कायम भरलेल्या असतात. शिवाय, दररोज पाच ते सहा गंभीर रुग्ण आयसीयू बेडच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला ससूनमध्ये आणण्यापूर्वी नातेवाइकांनी खाटांच्या उपलब्धतेची माहिती घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी केले आहे.
ससून हे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत टर्शरी केअर सेंटर आहे. येथे दररोज सरासरी १ हजार ६२९ रुग्ण बाह्यरुग्ण विभागात सल्ला, निदान व उपचारांसाठी येतात, तर १ हजार ३६ रुग्ण आंतररुग्ण विभागात दाखल होतात.
आयसीयूतील खाट रिकामी झाल्यानंतर संबंधित विभागाच्या प्रभारी परिचारिकेकडील प्रतीक्षा यादीनुसार ती पुढील रुग्णाला दिली जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही रुग्णालयांकडून गंभीर रुग्णांना अखेरच्या क्षणी ससूनमध्ये पाठविले जाते. सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि बीडसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतूनही अत्यवस्थ रुग्ण ससून येथे दाखल होतात.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णालयाने वैद्यकीय आयसीयूसाठी ४० आणि सर्जिकल आयसीयूसाठी २० अतिरिक्त खाटा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यासाठी आवश्यक अतिरिक्त डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. पवार यांनी या वेळी सांगितले.
...हा आहे हेल्पलाईन नंबर
आयसीयू बेडची गरज असल्यास रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे आधी नोंदणी करावी. पूर्वनोंदणीशिवाय अचानक रुग्ण आणल्यास तातडीने बेड मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या हेल्पलाइन क्र. ९२२५३३०५३५ यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधून बेडची चौकशी करावी, असे आवाहन ससून प्रशासनाने केले आहे.