पुणे: ससून रुग्णालयात मानसोपचार विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 6 वाजता औषधे देण्यासाठी ड्यूटीवर असलेल्या कर्मचा-याला रुग्ण जागेवर दिसला नाही.
त्याने ड्यूटीवरील वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने याबाबत माहिती दिली. त्याचा मृतदेह 11 मजली इमारतीच्या मागे आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रुग्णाचे नाव विजय असे असून, तो 25 वर्षांचा होता. विजयने 5 सप्टेंबर रोजी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. (Latest Pune News)
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तो रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात उपचार घेत होता. उपचार सुरू असतानाही त्याने 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण 5 सप्टेंबरपासून 10 सी या वॉर्डमध्ये दाखल झाला होता. पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. रुग्णाचे नियमित ड्रेसिंग सुरू होते. जखम बरी होण्याची प्रक्रिया सुरू होती, पण जखमेमुळे तो व्यवस्थित चालू शकत नव्हता. रुग्णाने उपचार व ड्रेसिंगसाठी आलेल्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.
रुग्णाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रेल्वे पोलिसांनी त्याला ससूनमध्ये दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि रुग्णाबरोबर कोणीही नातेवाईक नव्हते. त्याने 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय