पुणे : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) च्या वतीने 2021 या शैक्षणिक वर्षा करिता एमफिल व पीएचडी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यासाठी अर्ज करून अद्याप पात्रता यादी प्रसिद्ध झालेली नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार असला तरी अद्याप बैठक ही झालेली नसल्याने हे विद्यार्थी रखडलेले आहेत.
मराठा समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी निर्माण केलेल्या सारथीच्या वतीने 2021 या शैक्षणिक वर्षाकरिता जाहिरात दिली होती. त्यामध्ये 588 विद्यार्थ्यांची मुलाखतीस पात्र झाले व 565 विद्यार्थ्यांची मुलाखत दि. 13 ते 27 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आल्या व अनुपस्थित 66 विद्यार्थ्यांची मुलाखत 6 व 7 जानेवारी 2022 ला झाल्या. परंतु अद्याप पंधरा दिवस झाले असतानाही पात्रता यादी जाहीर केलेली नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असून बैठक कधी होणार याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. एमफिलच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी फेलोशिप देता येणार नाही. युजीसीने एमफिल नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले नाही त्यामुळे एमफिलच्या विद्यार्थ्यांचे हे शेवटचे वर्ष आहे.
याबाबत बोलताना मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले की, सारथीचे संचालक मंडळ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे. व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळ केवळ दिवस ढकलण्याचे काम करीत आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये हे संचालक मंडळ जाणून-बुजून अडथळा आणत आहेत. संचालक मंडळाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील.
https://youtu.be/FEtlxeG0ZyM