पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या
नामघोषात न्हाहली देहूनगरी
378वा सदेह वैकुंठगमन सोहळा
आम्ही जातो तुम्ही कृपा असु द्यावी|
सकळा सांगवी विनंती माझी॥1॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग|
वैकुंठ श्रीरंग बोलावितो॥2॥
अंतकाळी विठू आम्हासी पावला|
कुडीसहित झाला गुप्त तुका॥3॥...
आम्ही जातों आपुल्या गावा| आमुचा रामराम घ्यावा॥ या संतवाणीचा नामघोष करत टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड गजरात संत तुकाराम महाराज यांच्या 378व्या सदेह वैकुंठगमन सोहळा देहूनगरीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. लाखो वारकरी, दिंड्या, पताका आणि हरिनामाच्या घोषात पवित्र इंद्रायणीतीरावरील परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
गुरुवार (दि. 5) रोजी दुपारी बारा वाजता “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम”च्या जयघोषात नांदूरकीच्या वृक्षावर तुळशीपत्रे व पानाफुलांचा वर्षाव करून वैष्णवांनी याचि देही, याचि डोळा हा वैकुंठगमन सोहळा अनुभवला. “धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव| तेथे नांदे देव पांडुरंग॥” या अभंगोक्तीप्रमाणे देहूभूमी वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेली होती.
पहाटेपासूनच भक्तीचा उत्सव
पहाटे काकड आरतीने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर श्रींची तसेच शिळा मंदिर आणि वैकुंठस्थान मंदिर येथे विधिवत पूजा व महाआरती पार पडली. सकाळी दहा वाजता फुलांनी सजविलेल्या पालखीत संत तुकोबारायांच्या पादुका ठेवण्यात आल्या.
रूप पाहता लोचनी|
सुख झाले हो साजणी॥...
राहो आता हेचि ध्यान...
तुकाराम तुकाराम|
नाम घेता कापे यम॥
या अभंगांचे टाळ-मृदंगाच्या गजरात गाताना परिसर हरिनाममय झाला. साडेदहा वाजता मुख्य मंदिरातील भजनीमंडपातून पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. गरुड, टक्के, पताका, संबळ, नगारे, ताशे आणि तुतारीच्या निनादात दिंड्या पुढे सरकत होत्या. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड घोषात ही पालखी पावणेबारा वाजता वैकुंठस्थान मंदिरात दाखल झाली.
कीर्तनातून वैकुंठगमनाचा भावार्थ
वैकुंठस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप बाप्पू महाराज देहूकर यांच्या कीर्तनसेवेत घोंठवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती| मुक्त आत्मस्थिती सांडवीन॥... या अभंगाच्या माध्यमातून वैकुंठगमनाचा आध्यात्मिक भावार्थ उलगडला. कीर्तनाच्या अखेरीस “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दुपारी बारा वाजता लाखो वैष्णवांनी नांदूरकीच्या वृक्षावर तुळशीपत्रे, फुले अर्पण करून जगद्गुरू संत तुकाराम
महाराजांना भावपूर्ण निरोप दिला.
पैल दिसतील भार|
दिंड्या पताका अपार॥
आला पंढरीचा राणा|
दिसतील त्याच्या खुणा॥
सुख वाटे मना|
डोळे बाह्य स्फुरती॥
उठिले गजर नामाचे |
दळभार वैष्णवांचे॥
तुका करी रिता ठाव|
त्यासी बैसवया वाव॥
मान्यवरांच्या हस्ते पूजा-आरती :
देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे आदी मान्यवरांच्या हस्ते वैकुंठस्थान मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सोहळ्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली. दुपारी एक वाजता प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी भजनी मंडपात विसावली आणि दिवसभर हरिनामाचा अखंड नाद सुरूच राहिला. भक्ती, श्रद्धा आणि समर्पण यांचा अद्वितीय संगम असलेला हा वैकुंठगमन सोहळा देहूनगरीसह लाखो वैष्णवांच्या हृदयात अविस्मरणीय ठरला. “याचि देही, याचि डोळा” हा अनुभव प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात कायमचा कोरला गेला.
आपुल्या माहेरा जाईन मी आता| निरोप या संता हाती आला॥
सुख दुःख माझे ऐकीले कानी| कळवळा मनी करुणेचा॥
करुनि सिद्ध मूळ साऊले भांतुके| येती दिसे एकें न्यावयासी॥
त्याची पंथी माझे लागलेसे चित्त| वाट पाहे नित्य माहेराची॥
तुका म्हणे आता येतील न्यावया| अंगें आपुलिया मायबाप॥