Sant Tukaram Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi: भांडगावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; १७ हजार भाकरींचा महाप्रसाद

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी सेवाभावाने विविध सुविधा

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भांडगाव (ता.दौंड) येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यवत येथील मुक्काम उरकून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून पालखी सकाळच्या न्याहारीसाठी भांडगाव येथे सोमवार दि.१३ जुलै रोजी सकाळी १० वा.१५ मी विसावली. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भांडगाव मध्ये आगमन झाल्या नंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती पार पडली.

पालखी आगमनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. वारकरी संप्रदायातील दिंड्यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी फुलांची उधळण, जयघोष आणि पारंपरिक पद्धतीने पालखीचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी औक्षण करून वारकऱ्यांचे स्वागत केले, तर गावातील युवकांनी शिस्तबद्ध नियोजन करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

वारकऱ्यांच्या भोजनासाठी भांडगाव ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची व्यवस्था केली होती. यामध्ये १५० किलो पिठलं, २५० किलो भात आणि तब्बल १७ हजार भाकऱ्या तयार करण्यात आल्या. हजारो वारकरी भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या या सेवाभावाचे वारकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

तसेच विलास दोरगे यांच्या 'सावळा व्हेज' च्या वतीने वारकऱ्यांसाठी उत्तम न्याहारीची व्यवस्था करण्यात आली. विविध स्वयंसेवकांनी भाविकांना पिण्याचे पाणी, नाश्ता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या प्रसंगी श्री रोकडोबानाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पालखी मार्गावर आकर्षक आणि मनमोहक रांगोळ्या साकारून वारकरी संप्रदायाचे स्वागत केले. रंगीबेरंगी रांगोळ्यांनी परिसर अधिकच भक्तिमय आणि उत्सवी बनला.

यावेळी दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नितीन दोरगे, सरपंच लक्ष्मण काटकर, उपसरपंच सुनंदा गायकवाड, सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल कारंडे, विलास दोरगे, प्रमोद दोरगे, अमित दोरगे, विजय शेंडगे, विजय दोरगे, श्याम कापरे, सुदाम कोलते, दत्तात्रय दोरगे, रविंद्र दोरगे, रवींद्र जाधव, बाळासाहेब दोरगे, शंकर हरपळे, गोरख दोरगे, रामदास दोरगे, बाबू कापरे, विठ्ठल दोरगे महेश काटकर यांच्यासह ग्रामस्थ, महिला, युवक आणि मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते. भांडगाव ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी केलेले नियोजन, भोजन व्यवस्था, स्वच्छता, शिस्त आणि आदरातिथ्य यामुळे पालखी सोहळ्याला विशेष रंगत आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT