Sant Tukaram Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi: पाटस भक्तीरंगात न्हाऊन निघाले; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत

रोटी घाटाच्या प्रवासासाठी वारकऱ्यांची विशेष काळजी; गोड जेवण, चहा-नाश्त्यासह ग्रामस्थांकडून सेवाभावाचा आदर्श

पुढारी वृत्तसेवा

अक्षय देवडे

पाटस: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. १४) सकाळी पाटस (ता. दौंड) येथे दाखल होताच ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, फुलांची उधळण करत आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. वरवंड ते उंडवडी हा पालखी सोहळ्यातील सर्वांत मोठा टप्पा असल्याने पुढील रोटी घाटाचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पाटसकरांनी वारकऱ्यांसाठी पारंपरिक गोड जेवणासह चहा-नाश्त्याची उत्तम व्यवस्था केली.

रविवारी (दि. १२) यवत येथे पहिला तर सोमवारी (दि. १३) वरवंड येथे दुसरा मुक्काम करून मंगळवारी सकाळी ६ वाजता आरतीनंतर पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना झाला. वरवंडपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील भागवतवाडी येथे सकाळी आठच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. येथे वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा पाटसच्या मुख्य चौकात सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पोहोचला. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करत भक्तिभावाचे दर्शन घडविले.

त्यानंतर गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात पालखीने प्रवेश केला. भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. पुढील प्रवासातील रोटी घाट हा अवघड टप्पा लक्षात घेऊन पाटस ग्रामस्थांनी सर्व वैष्णवांसाठी नेहमीप्रमाणे गोड जेवणाची व्यवस्था केली. वारकऱ्यांनी या प्रेमळ आदरातिथ्याचे भरभरून कौतुक केले.

पालखी सोहळ्यामुळे पाटस परिसरात विविध दिंड्यांचा मुक्काम झाल्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले होते. सालाबादप्रमाणे पाटस व्यापारी संस्था, आरोग्य विभाग, पाटस व कुसेगाव ग्रामस्थ तसेच अनेक छोटे-मोठे व्यावसायिक यांनी चहा, नाश्ता, खाऊ व इतर सेवा देत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा सत्वशील शितोळे, पंचायत समिती सदस्य शिवाजीबापू ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सागर शितोळे, ज्येष्ठ नागरिक डॉ. मधुकर आव्हाड, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकाण, संभाजी देशमुख, स्वप्नील भागवत, गणेश चव्हाण, उद्योजक राहुल आव्हाड, ग्रामसेवक दीपक बोरावके, ग्रामसेवक भाऊसाहेब कांबळे, कवी सुधीर पानसरे, अशोकराव पानसरे, वरवंड-पाटस आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT