२२ किलो वजन अन २२ कोटींचा कळस मंदिर शिखरावर स्थापित
रथोत्सवाने साजरा झाला माऊलींचा जन्मोत्सव
आळंदी : कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. १५) आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर शिखरावर २२ किलो वजनाचा व सुमारे २२ कोटी रुपयांचा सुवर्ण कळस बसविण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कलशाचे पूजन करण्यात आले. तपस्वी वारकरी शांतीब्रम्ह मारुती बाबा कुऱ्हेकर, ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते हे कलशारोहन करण्यात आले. तत्पूर्वी देऊळवाड्याच्या महाद्वाराच्या जिर्णोध्दार कामाचा शुभारंभ पूजन करत करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माऊलींच्या संतकार्याचा गौरव करत त्यांच्या मंदिरावर सुवर्णकलश बसविण्यात आला ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. आमच्या मात्या-पित्यांनी चांगली कामे केली असतील म्हणून या ठिकाणी येण्याचे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असेही त्यांनी सांगितले. महादजी शिंदे यांच्या पराक्रमाचे दाखले देत त्यांनी माऊलींच्या मंदिर उभारणीत दिलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील या सुवर्ण कलशासाठी दान देत समर्पण केले याचही त्यांनी कौतुक केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात भावनिक मुद्द्यांना हात घालत एक काळ असा होता की माऊलींच्या आणि त्यांच्या या भावंडांच्या तोंडात अन्नाचा घास नव्हता. आज त्याच माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कळस आहे, ही किती भावनेची आणि श्रद्धेची बाब असल्याचे म्हटले. आळंदी देवस्थानच्या विविध उपक्रमासाठी आम्ही कायमच मदत करत आलो असून येत्या काळात देखील देवस्थानच्या प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगत त्यांनी आम्ही देखील वारकरी असून वारकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार कायमच तत्पर असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी सार्थ ज्ञानेश्वरीचे ॲडिओ बुक प्रकाशन करण्यात आले.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, देवेंद्र कुटे, उमा खापरे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील,विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व इतर भाविक,ग्रामस्थ,मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान कलशारोहनप्रसंगी मंदिराच्या देऊळवाड्याच्या मुख्य महाद्वार व नगारखाना खोलीचे जिर्णोध्दार कामाचा पूजन करत शुभारंभ करण्यात आला. गोकुळाष्टमी व माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी सहा ते नऊच्या सुमारास माऊलींचा मुखवटा लाकडी रथात ठेवून रथोत्सव साजरा करण्यात आला. रात्री दहा ते बाराच्या सुमारास मंदिरात मोझे यांचे वतीने ह.भ.प. शरद महाराज बंड यांचे श्रीकृष्ण जन्म व संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवाचे किर्तन पार पडले. यावेळी समाधीवर आरती घेत पुष्पवृष्टी करण्यात आली.