पुणे

सणसवाडीत लूटमार करणारे जेरबंद ; शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  सणसवाडी येथे पहाटेच्या सुमारास पायी चाललेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्‍या पाच जणांच्या टोळक्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांत या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. श्रीकांत मिनिनाथ मारणे, रोहित बाबूराव पवार, गणेश नितीन जावडेकर, जितेंद्र शंकर चिंधे आणि अनिकेत अनिल वाघमारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल अँड टी फाटा येथून हिमांशू पाटील, शिवा पटेल व कृष्णकांत आदिवासी हे तिघे जण शुक्रवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास गावाहून येऊन घरी चालले होते. या वेळी पाठीमागून दोन दुचाकीवरून पाच युवक त्यांच्याजवळ आले. यातील एका युवकाने हिमांशूच्या गळ्याला कोयता लावून शिवीगाळ, दमदाटी केली, तर दुसर्‍या युवकाने शिवा व कृष्णकांत यांना कोयता दाखवून शिवीगाळ, दमदाटी करीत त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली होती. त्यानंतर हिमांशू बि—जेशकुमार पाटील (वय 20, रा. सणसवाडी, ता. शिरूर, मूळ रा. तिगजा, ता. मेजा, जि. प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात पाच युवकांवर दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

त्यानंतर दुपारच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत निमगाव म्हाळुंगी फाटा येथे काही युवक असून, त्यांच्याकडे कोयता असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे, शिवाजी चीतारे, शंकर साळुंके, चंद्रकांत काळे, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, अविनाश पठारे यांना मिळाली. त्यांनी तातडीने तेथे जात युवकांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल, तसेच कोयते मिळून आले.

या वेळी पोलिसांनी श्रीकांत मारणे (वय 28, रा. शंकर मंदिराजवळ कोथरूड, पुणे), रोहित पवार (वय 18, रा. धायरी फाटा, पुणे), गणेश जावडेकर (वय 18, रा. रासकर मळा, जनता वसाहत, पर्वती पुणे), जितेंद्र चिंधे (वय 31, रा. जांभूळवाडी, दत्तनगर कात्रज, पुणे) आणि अनिकेत वाघमारे (वय 22, रा. नंदनवन कॉलनी, कोथरूड, पुणे) यांना अटक करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT