भवानीनगर: सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गटात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढणार आहे.
सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटांत जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण आहे. सणसर पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण आहे व लासुर्णे पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गाचे आरक्षण आहे.
सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटांत जिल्हा परिषदेसाठी तसेच पंचायत समितीसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 27 जानेवारी पर्यंत असून उर्वरित चार दिवसांत कोण अर्ज मागे घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
सणसर-लासुर्णे गटांत राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी निवडणूक होईल असे चित्र होते. परंतु, काही उमेदवारांनी निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या गटामध्ये आता दुरंगीऐवजी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. परंतु, सणसर पंचायत समिती गणातून एक लासुर्णे पंचायत समिती गणातून एक असे दोन पंचायत समिती गणांतील इच्छुक व जिल्हा परिषद परिषदेसाठी एका इच्छुकाने मिळून आघाडी निर्माण केली आहे. आघाडीच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार या तिघांनी केला आहे. त्यामुळे सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग््रेास भारतीय जनता पार्टी व अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे.