पुणे: मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे॥ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे वारीच्या वाटेवर सुखाचा, समाधानाचा आणि भक्तीचा गंध वाटणारे एक साधेभोळे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय शिंदे माउली.
वय ६० वर्षे, डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात गंधाची वाटी घेऊन पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला थांबवून त्याच्या कपाळावर गंध-टिळा लावणारे संजय शिंदे हे उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूरजवळील बामणीवाडी गावचे राहणारे आहेत.
घरात शेतीवाडी आहे, दोन मुले सुखात आहेत, वयाची साठी गाठली; तरी पंढरीच्या विठुरायाची ओढ आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची अनावर इच्छा त्यांना दरवर्षी घरदार सोडून वारीच्या वाटेवर ओढून आणते.
संजय शिंदे हे दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. मात्र, वारीत फक्त स्वतः चालण्यापेक्षा विठ्ठलरूपातील वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडावी, या भावनेतून त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. गेल्या ५ वर्षांपासून ते वारीच्या संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांना मोफत गंध-टिळा लावण्याची सेवा करीत असून, वारकऱ्यांची सेवा करण्याचा वसा घेतल्याचे त्यांनी सांगितले.