यवत : शिवसेनेचे नेते (उद्धव ठाकरे गट) खा. संजय राऊत यांचे दौंड तालुक्यातील दौरे भाजप आमदार राहुल कुल यांना फायदेशीर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राऊत यांनी दौंडमध्ये केलेले दौरे आणि त्या वेळी केलेल्या आरोपानंतर झालेल्या कोणत्याही निवडणुकीत कुल यांना भरारी देणारे ठरले आहेत. खा. संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असणार्या भीमा-पाटस साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबईत 13 मार्च ते 20 मार्चदरम्यान पत्रकार परिषदा घेऊन केला होता. त्यानंतर त्यांनी आपण स्वतः भीमा-पाटस कारखान्याला भेट देऊन आ. कुल यांच्या कारभाराविरोधात जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले होते.
संबंधित बातम्या :
त्यानुसार त्यांनी दि. 26 एप्रिल रोजी वरवंड येथे जाहीर सभा घेत आ. कुल यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होती. या निवडणुकीत आ. कुल यांनी बाजी मारत पहिल्यांदाच बाजार समितीवर वर्चस्व मिळवले होते. आ. कुल यांनी राऊत यांच्या सभेला उत्तर देताना राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून मतदारांनी बाजार समिती माझ्या ताब्यात दिली असल्याचे सांगितले होते.
यानंतर देखील खा. संजय राऊत यांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील काष्टी येथे एक खासगी कार्यक्रम आटोपून जात असताना दौंड शहरात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आ. कुल यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मात्र, सोमवारी (दि. 6) जाहीर झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल पाहता आ. कुल यांना 11 ग्रामपंचायतींपैकी 8 ठिकाणी सत्ता मिळाली असून, पुन्हा एकदा आ. कुल यांना खा. संजय राऊत यांचा दौरा फायदेशीर ठरला असल्याचे दिसून आले आहे.
आ. कुल समर्थकांची मिश्किल टिप्पणी
आ. कुल आणि खा. राऊत यांच्यामधील राजकीय वैर वाढत असताना आ. कुल यांना खा. राऊत कसे फायदेशीर ठरत आहेत, हे आ. कुल यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत आ. कुल यांच्या विरोधात खा. राऊत यांची सभा ठेवली, तर आमदार राहुल कुल यांचा विजय आणखी सोपा होईल, अशी मिश्किल टिप्पणी देखील आ. कुल समर्थक करताना पाहायला मिळत आहेत.