Sanitation workers attacked in Pune
पुणे: पुणेकरांना सकाळी शहर स्वच्छ दिसावे, यासाठी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहरात रात्रीच्या वेळी रस्ते स्वच्छतेचे काम सुरू करण्यास सांगितले आहे. त्यांच्या सूचनांनुसार रात्री शहर स्वच्छदेखील केले जात आहे.
मात्र, शहर स्वच्छ करणार्या कर्मचार्यांवर काही गुन्हेगार आणि मद्यधुंद व्यक्तींनी हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कर्मचार्यांवर हल्ले झाले असून त्यामुळे स्वच्छता विभागातील कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Pune News)
दोन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांसह सकाळी शहराचा दौरा केला. या वेळी अनेक रस्त्यांवर कचर्याचे ढीग दिसले. सकाळी फिरायला किंवा कामावर जाणार्या नागरिकांना स्वच्छ शहर दिसावे, यासाठी आयुक्तांनी रात्रीच रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्रीच्या वेळी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले असून काम सुरू झाले आहे.
मात्र, कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या हल्ल्यांनंतर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या कर्मचार्यांकडून पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. “अशा घटना घडतच असतात,” असे सांगत पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी कर्मचार्यांना हुसकावून लावले.
कै. बा. स. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पुणे स्टेशन परिसरात प्रभाग क्र. 22 मध्ये हनुमंत लोंढे हे रात्रपाळीत सफाई करत असताना, दारू पिलेल्या रिक्षाचालकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. झाडू मारताना थोडासा स्पर्श झाल्याने संतप्त रिक्षाचालकांनी शिवीगाळ करत बांबूने मारहाण केली.
त्यानंतर आणखी तीन जणांना बोलावून पाठलाग करण्यात आला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यांची पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी फक्त साध्या कागदावर माहिती लिहून घेतली आणि दुर्लक्ष केले. तर दुसर्या घटनेत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्र. 41 मधील खडी मशिन चौक ते इस्कॉन मंदिर परिसरात रात्री 2 वाजता सफाई करणारे कंत्राटी कर्मचारी बाळासाहेब म्हस्के यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडून 18 हजारांचा मोबाइल व 750 रुपये लुटले. सकाळी तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, कोंढवा पोलिस ठाण्यात दिवसभर तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर महापालिका कामगार युनियनच्या हस्तक्षेपामुळे तक्रार दाखल करण्यात आली.