पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या सॅनिटरी नॅपकिन निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना तातडीने सीएसआर फडांतून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. दरम्यान, या विरोधात गुरुवारी आपच्या महिला पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या गाडीच्या काचेवर सॅनिटरी नॅपकीन चिकटवून निषेध केला.
महापालिकेच्या शाळांमधील सातवी ते दहावीतील 38 हजार विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होते. मागील वर्षी सॅनिटरी नॅपकिनसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. आता महापालिका ही प्रक्रिया राबवित आहे. यामध्ये भाजप आमदार व खासदारांनी मर्जीतील ठेकेदारांना निविदा मिळविण्यासाठी एजंटगिरी सुरू केली आहे. भाजपच्या आमदार आणि खासदार यांच्यामधील अंतर्गत वादामुळे गरीब विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन मिळत नाहीत. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी.
ही निविदा प्रक्रिया होईपर्यंत थेट उत्पादकाकडून पालिकेने विशेष बाब म्हणून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख संगिता ठोसर, पल्लवी जावळे, सविता मते, विभाग संघटिका करूणा घाडगे, शाखा संघटिका कल्पना पवार यांनी ढाकणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आम आदमी पक्षातर्फे महापालिकेच्या आवारात आयुक्त विक्रम कुमार यांच्या वाहनाला प्रतीकात्मक स्वरूपात सॅनिटरी नॅपकिन चिकटवून पालिका प्रशासनाचा निषेध केला. दोन महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. यानंतर आयुक्तांनी तातडीने सॅनिटरी नॅपकिन वितरण सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेवून गुन्हा दाखल केला. आपचे युवा आघाडी अध्यक्ष अमित मस्के, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, महिला उपाध्यक्ष नी अनिश, किरण कांबळे, छाया भगत, श्रद्धा शेट्टी, मनोज शेट्टी, पूजा वाघमारे आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा