‘राजगड’चे नूतनीकरण करणार: संग्राम थोपटे Pudhari
पुणे

Rajgad Sugar Factory| ‘राजगड’चे नूतनीकरण करणार: संग्राम थोपटे

यंदाचाही हंगाम घेणार

पुढारी वृत्तसेवा

भोर: भोर-राजगड तालुक्यातील रोजगाराचे अनेक वर्षांपासून अर्थचक्र थांबले होते. या तालुक्यात आर्थिक रोजगाराला चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारने राजगड सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या (एनसीडीसी) माध्यमातून मिळणार्‍या कर्जपुरवठ्यास हमी घेतली असल्यामुळे यंदाचाही हंगाम घेऊन पुढील वर्षी राजगड कारखान्याचे नूतनीकरण करणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात बुधवारी (दि. 27) आयोजित पत्रकार परिषदेत थोपटे बोलत होते. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके, संचालक विकास कोंडे, जिल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब गरुड, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, माजी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, उत्तम थोपटे, रवींद्र कंक, शिवनाना कोंडे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, सुरेखा निगडे, समीर घोडेकर, आबा शेलार, अभिषेक येलगुडे, शंकर मालुसरे, सुभाष कोंढाळकर, सर्व संचालक, शेतकरी कामगार उपस्थित होते. (Latest Pune News)

थोपटे म्हणाले की, शेतकरी आणि कामगारांना राज्य सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. भोर-राजगड तालुक्यात गणेशोत्सवाच्या पर्वात सर्वत्र आनंद द्विगुणित झाल्याचा आनंदोत्सव पाहावयास मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या विनंतीनुसार राष्ट्रीय सहकार विकास मंडळ (एनसीडीसी) नवी दिल्ली यांच्या माध्यमातून राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर-निगडे या कारखान्यास प्रतिदिन 3500 मे. टन गाळपक्षमता प्रकल्प उभारणीसाठी व 60 के.एल.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प व 12 मेगावॅट सहवीज प्रकल्प तसेच 5 टन सी.एन.जी. गॅस प्रकल्प उभारण्यासाठी तसेच शेतकरी आणि कामगार यांच्या देणी देण्यासाठी आणि खेळत्या भांडवलासाठी 467.75 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने कर्जहमी दिली आहे. नवीन प्रकल्पासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बंद पडलेल्या रोजगाराला भविष्यात या माध्यमातून आर्थिक चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. राहुल कुल संबंधित विभागाचे अधिकारी यांचे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सभासद, शेतकरी कामगार, जनतेच्या वतीने आभार मानत आहे, असेही थोपटे यांनी सांगितले. दरम्यान, रायरेश्वर कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

कारखान्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही थोपटे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांसाठी मोठी भेट

राजगड साखर कारखान्याचे कामकाज सहकारी तत्त्वानुसार होत असल्यामुळे कारखाना हा माझा नसून सभासद, शेतकरी, कामगार यांचा आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारने कर्जाची हमी घेतल्याची मोठी भेट मिळाली आहे, असेही कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT