कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातून चंदनाच्या झाड तोडून ते चोरून नेत होते. दौंड व कुरकुंभ पोलीसांनी पाठलाग करून ४ जणांना पकडले. यादरम्यान एकजण पळून गेला आहे. संशियत आरोपींकडून १ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवार (दि.२९) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. (Latest Pune News)
याबाबत संजय कोठावळे यांनी फिर्याद दिली आहे. प्रकरणी नितीन संजय माने (वय ३८, रा. नीरा, ता. पुरंदर), भाऊसाहेब गोरख जाधव (वय २७, रा. देलवडी, ता. दौंड), लहू तानाजी जाधव (वय ३६, रा. दापोडी, ता. दौंड), अनिल अशोक माने (वय ४०, रा. केडगाव चौफुला, ता. दौंड) आणि दिगंबर बलाशा काळे (वय ४०, रा. वाखरी चौफुला जवळ, ता. दौंड) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील अल्काइल अमाइन्स केमिकल कंपनीच्या जवळ काहीजण चंदनाच्या झाडाची तोड करून ते चोरून नेत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला. दरम्यान वरील ४ जणांना ताब्यात घेतले, तर दिगंबर काळे हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. ताब्यात घेतलेल्यांकडून १ लाख ८० हजाराची ९ चंदनाची लाकडे, (एकूण १८० किलो) व झाड तोडण्याचे साधन मिळून आले.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, हवालदार, सागर म्हेत्रे, पठाण, किरण पांढरे, संजय कोठावळे, निखिल जाधव अमीर शेख, यांनी केली आहे. पुढील तपास निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण ढुके करीत आहेत.