पुणे: महापालिकेच्या मैदानात ढोल-ताशा पथकांना सराव करण्यास परवानगी दिली नसतानादेखील सणस मैदानातील कबड्डी आणि बॉक्सिंगच्या मैदानात शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकाने येथे पाहणी करूनसुद्धा अतिक्रमणाकडे डोळेझाक केल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या सणस मैदान परिसरात ढोल पथकांनी मैदान, पाण्याची टाकी व प्रवेशद्वारावर वादनाच्या सरावासाठी शेड उभारले आहेत. या शेडचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या कोणत्याही मैदानावर पथकांना वादनसरावासाठी परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा आयुक्तांनी केली होती. तसेच काही काम झाले असल्यास तेथे पाहणी करण्यासाठी पथक पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. (Latest Pune News)
आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकाने सणस मैदनात पाहणी केली. मात्र, येथे उभारण्यात आलेल्या शेडवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे प्रशासन भाजप पदाधिकार्यांच्या दबावापुढे झुकल्याचे सिद्ध झाले आहे. मागील काही वर्षांपासून सारसबागेजवळील सणस मैदानांचे मुख्य प्रवेशद्वार, बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर, नेहरू स्टेडियमचे प्रवेशद्वार तेथील कबड्डी मैदान आदी ठिकाणी ढोल पथके परवानगी नसताना सराव करत आहे.
भाजप शिष्टमंडळाने बुधवारी घेतली होती आयुक्तांची भेट
बुधवारी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन ढोल ताशा पथकांच्या वादनसरावासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, महानगरपालिकेच्या मैदानावर आम्ही परवानगी देणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. असे असतानादेखील ढोल ताशा पथकांनी या ठिकाणी शेड उभारून सराव सुरू केला आहे.