मुंढवा; पुढारी वृत्तसेवा : पोलिस माता-भगिनींनी एकमेकींना टाळ्या देत खळखळून हास्याचा योग जुळून आला अन् पोलिसांच्या कुटुंबीयांनी याचा मनमुराद आनंद लुटला. 'शांताबाई…', 'पाटलांचा बैलगाडा…' यांसह विविध हिंदी व मराठी गाण्यांवर महिलांनी ठेका धरत नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला. निमित्त होते 'खेळ गृहलक्ष्मींचा' कार्यक्रमाचे..! अंतिम फेरीत बाजी मारत सना पटवेगर यांनी प्रथम क्रमांकाची स्वामिनी पैठणी, तर उपविजेत्या स्नेहल शिंदे यांनी मानाची कुंदेन साडी पटकावली.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दै. 'पुढारी', 'पुढारी न्यूज', कात्रज दूध संघ आणि स्वामिनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने वैदुवाडी येथील एसआरपीएफ गट क्र. 2 सुरक्षानगर, पोलिस वसाहत येथे 'खेळ गृहलक्ष्मींचा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 'एसआरपीएफ'चे पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) सुधीर महल्ले व पोलिस निरीक्षक एस. आर. आरोंदेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण
करण्यात आले.
पोलिस वसाहत येथे आयोजित 'खेळ गृहलक्ष्मींचा' या कार्यक्रमात सर्वप्रथम 'उखाणे घ्या' मध्ये शब्दांची जुळवाजुळव करताना महिला भगिनींची होत असलेली कसरत निखळ हास्याचा आनंद देणारी होती. त्यानंतर दोरीवरील उड्या मारताना तसेच तळ्यात-मळ्यात करताना एक-एक स्पर्धक बाहेर पडत असताना शेवटी कोण राहील, याची उत्सुकता लागली होती.
महिलांचा ग्रुप डान्सही लक्षवेधक ठरला. शेवटच्या टप्प्यातील 'संगीत खुर्ची' प्रसंगी मानाची पैठणी कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सना पटवेगर यांनी प्रथम क्रमांकाची स्वामिनी पैठणी, तर उपविजेत्या स्नेहल शिंदे ह्या कुंदेन साडीच्या मानकरी ठरल्या. 'कात्रज दूध'चे वरिष्ठ व्यवस्थापक कुमार मारणे यांनी या कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन केले.
सुरक्षानगर येथील पोलिस वसाहतीमधील 'खेळ गृहलक्ष्मींचा' या कार्यक्रमाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. महिला पोलिस, ज्येष्ठ महिलाही यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमातील विविध खेळांमुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. याबद्दल दै. 'पुढारी' व 'पुढारी न्यूज'चे आभार.
– सुधीर महल्ले, पोलिस उपअधीक्षक,
एसआरपीएफ गट दोन'दै. पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिलांसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविले जात आहेत. यापुढेदेखील असेच कार्यक्रम नियमित राबविले जावेत.
– रमेश कुंदेन,
संचालक, कुंदेन साडी शॉपी'खेळ गृहलक्ष्मींचा' या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मला पहिल्यांदाच मिळाले असून, त्यामुळे खूप आनंद झाला. 'एसआरपीएफ'मधील महिलांचे पती सतत कर्तव्यावर असल्याने बाहेरगावी असतात. परिणामी, आम्हाला सण व उत्सवांचा आनंद व्यवस्थित घेता येत नाही. मात्र, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व जण एकत्र आलो आणि खूप धमाल केली.
– सना पटवेगर, पैठणीच्या मानकरी
हेही वाचा