पुणे: ’आपल्या भारतीय संस्कृतीत महिलेचा सन्मान ही परंपरा आहे. पुढील पिढीला देखील कळले पाहिजे की, स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. नारी शक्तीच्या कार्याला सलाम करण्याचे काम या संस्थेकडून केले जात आहे. पोलिस खात्यातील महिलांचा सन्मान केल्यामुळे त्यांना वर्षभर याची ऊर्जा मिळेल,’ असे मत सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिराच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात महिला पोलिस अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, भरत अग्रावाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
ॲड. प्रताप परदेशी यांनी केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम या उत्सवात होतात. ’स्त्री शक्तीची पूजा करून हा नवरात्रोत्सवात साजरा केला जात आहे. पोलिस महिला अधिकारी या घरातील जबाबदारी पार पाडून त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा सत्कार करण्यात येत आहे,’ असे सांगितले.
नवरात्र उत्सवाचा कालावधी वर्षभरासाठी ऊर्जा देतो. या उत्सवामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि अनेक महिलांना उत्साह मिळतो, अशी भावना महिला पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.