पुणे: मारणे टोळीतील रूपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशी तालुक्यातील आंदगावमधील एका बंगल्यातून मंगळवारी (दि. 28) पहाटे अटक केली आहे. आयटी अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून गेली नऊ महिने रूपेश पोलिसांना गुंगारा देत होता. (Latest Pune News)
शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात गजा मारणे टोळीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजा मारणे व त्याची टोळी चित्रपट पाहून कोथरूडकडे परत जात होती. त्यावेळी मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यातून या टोळीने जोग याला मारहाण केली होती. त्यात गजानन मारणे याच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून रूपेश मारणे हा फरार होता. कोथरूड पोलिस तसेच गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. मुळशी तालुक्यातील आंदगावमधील एका मोठ्या बंगल्यात तो राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने पहाटेच्या सुमारास या बंगल्याला वेढा घातला. तो पळून जाऊ नये, यासाठी सर्व बाजूने पोलिस अधिकारी व अंमलदार हे सज्ज होते. त्यानंतर त्यांनी दरवाजा वाजविला. महिलेने दार उघडल्यावर पोलिसांनी आत शिरून रूपेश मारणे याला ताब्यात घेतले.
रूपेश मारणे हा गजानन मारणे टोळीतील एक प्रमुख सदस्य आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, व्यावसायिकाचे अपहरण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाचे अपहरण करून चार कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन वर्षांपूर्वी गजा मारणे, रूपेश मारणे याच्यासह १५ जणांवर मोक्का कारवाई झाली होती. त्यावेळीही रूपेश हा अनेक महिने फरार होता. तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातून अटक केली होती.
रूपेश मारणे हा मुळशी तालुक्यातील आंदगावमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास त्याला पकडले.संभाजी कदम, पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन