आळेफाटा : दीपावली सणामुळे कांद्यास वाढलेली मागणी व पावसामुळे लाल सेंद्रिय कांद्याच्या काढणीवर झालेला परिणाम यामुळे उन्हाळ कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवार (दि. 26) झालेल्या लिलावात कांद्याला प्रति दहा किलोस 221 कमाल भाव मिळाला आहे. याबाबत सभापती संजय काळे उपसभापती प्रितम काळे यांनी दिली. (Latest Pune News)
एप्रिल, मे महिन्यात काढणी झालेल्या उन्हाळ कांद्याची भाव नसल्यामुळे साठवणूक करण्यात आली होती. पावसाळ्यातही कांद्याच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यातून पावसाने कांदा सडेल या भीतीने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागला. बाजारपेठेत यामुळे कांद्याची आवक वाढली होती. त्यामुळे आळेफाटा उपबाजारात ऑगस्ट महिन्यात आवक वाढत गेली.
आळेफाटा उपबाजारात 14 ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याची उच्चांकी 25 हजार गोणी आवक झाली होती. मात्र, बाजारभाव हे प्रति दहा किलोस दीडशे रुपयांवर कमाल असेच मिळत होते. सध्या साठवणूक केलेला उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यात आल्याने आवकही कमी होऊ लागली आहे.
दीपावलीनिमित्त आळेफाटा उपबाजारात मंगळवार व शुक्रवार कांदा लिलाव झाले नाही. रविवारी झालेल्या लिलावात 11 हजार 406 गोणी कांद्याची आवक झाल्याचे संचालक नबाजी घाडगे सचिव रुपेश कवडे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी माहिती दिली. दक्षिणेकडील राज्यांमधून तसेच दीपावलीनिमित्त कांद्यास मागणी वाढली आहे. तर पावसाने नवीन लाल कांद्याच्या काढणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे येथील कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, जीवन शिंदे, शिवप्रसाद गोळवा, अनिल गडगे, ज्ञानेश्वर गाढवे, नीलेश भुजबळ, चारुदत्त साबळे यांनी सांगितले.
एक्स्ट्रा गोळा : 200 ते 221
सुपर गोळा : 180 ते 200
सुपर मीडीयम: 160 ते 180
गोल्टी/ गोल्टा: 140 ते 160
बदला/ चींगळी: 50 ते 100