पुणे: विविध चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना रुपेरी चित्रकथा मराठी चित्रपट महोत्सवात मिळाली अन् या महोत्सवाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या या महोत्सवात विविध विषयांवरील आणि वेगवेगळ्या काळातील गाजलेल्या मराठी चित्रपट दाखविण्यात आले. विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या रंगमंचावर उभारण्यात आलेल्या भव्य पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळाला.
मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत आणि दर्जेदार कलाकृतींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगले आणि बालगंधर्व रंगमंदिराचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांच्या हस्ते झाले.
महोत्सवाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'सामना' या चित्रपटाने झाली. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. याशिवाय 'गांधी टॉक्स' या मूकपटासह 'गुलकंद', 'श्यामची आई' आणि 'माफीचा साक्षीदार' या चित्रपटांच्या प्रदर्शनालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'गुलकंद'चे निर्माते-दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे हे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उषा नाडकर्णी यांनी, अशा चित्रपट महोत्सवांची गरज अधोरेखित केली. नाट्यगृहांमध्ये कमी खर्चात किंवा विनामूल्य चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वसामान्य प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे आकर्षित होतात, मल्टिप्लेक्समधील वाढत्या तिकीटदरांमुळे अनेकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे परवडत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रेक्षकांची थेट दाद मिळते, असेही त्या म्हणाल्या.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरासह शहरातील इतर नाट्यगृहांमध्येही अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव आयोजित करण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. बाबासाहेब पाटील, नितीन धवणे, कौस्तुभ कुलकर्णी, अपेक्षा चव्हाण आणि अजय फुटाणे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवार (दि. १९) पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात 'अशी ही बनवाबनवी', 'कायद्याचं बोला', 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम', 'आशा', 'देऊळ', 'पिंजरा', 'श्वास', 'आरपार', 'एप्रिल मे ९९' आणि 'बाप्या' यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट विनामूल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.