पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या तीन महिन्यांत तब्बल 252 रिक्षाचालकांविरोधात आलेल्या तक्रारींमुळे कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणार्या आणि प्रवाशांशी उद्धट वर्तन करणार्यांना त्यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. (Pune Latest News)
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांमुळे आणि केलेल्या दंडामुळे रिक्षाचालक-मालकांच्या वर्तुळात घबराट पसरली असून, याबाबत आरटीओने सौम्य भूमिका घ्यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. त्याचप्रमाणे सर्व रिक्षा व्यावसायिकांनी प्रवाशांना नियमानुसार उत्तम सेवा पुरवावी, असे आवाहनही केले आहे.
एप्रिल ते जून 2025 या कालावधीत आरटीओला 252 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 175 रिक्षाचालकांना नोटिसा पाठविल्या आहेत. इतर तक्रारींवर लवकरच कारवाई केली जाणार आहे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील रिक्षाचालकांना पांढरा शर्ट आणि खाकी पँट, असा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार हा नियम लागू आहे. अनेक रिक्षाचालक या नियमाचे पालन करीत नसल्याचेही आरटीओच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
1) भाडे नाकारणे - 102
2) उद्धट वर्तन - 55
3) अतिरिक्त भाडे आकारणी - 65
4) फास्ट मीटर - 30
- एकूण तक्रारी - 252
पुणे आरटीओने मनमानी करणार्या रिक्षाचालकांची तक्रार करण्यासाठी 8275330101 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल नंबर, प्रवास मार्ग, रिक्षा नंबर, रिक्षाचा फोटो आणि मीटर भाड्याचा फोटो पाठवून तक्रार दाखल करावी. आरटीओकडून अशा तक्रारींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.