पुणे: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश घेण्याची मुदत १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आत्तापर्यंत ९३ हजार १३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यात 'आरटीई' प्रवेशासाठी यंदा २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित निवड फेरीत ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळाली आहे. याशिवाय प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीत १२ हजार ९५० तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीत ४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
२१ हजार ६९५ जागा अद्याप रिक्त
प्रवेशासाठी उपलब्ध १ लाख १४ हजार ८२६जागांपैकी ९३ हजार १३१ जागांवर प्रवेश झाले असल्यामुळे अद्यापही २१ हजार ६९५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी प्रवेशाची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चितीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
'आरटीई' प्रवेश दृष्टिक्षेप
एकूण नोंदणी - २,८९,२८६
निवड यादीतील विद्यार्थी - १,०५,८११
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी - ८६,०३४
नियमित निवड फेरी - ७९,७७६
प्रतीक्षा यादी (पहिली) - १२,९५०
प्रतीक्षा यादी (दुसरी) - ४०५
प्रवेशासाठी उपलब्ध जागा - १,१४,८२६
प्रवेशासाठी रिक्त जागा - २१,६९५
प्रवेशाची मुदत - १२ जून २०२६ पर्यंत