Education Pudhari
पुणे

RSS Education Institutions Board Change: शैक्षणिक संस्थांमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया; ‘आरएसएस’कडून तरुणांना संधी

महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्थांच्या नियामक मंडळांमध्ये बदल; दीर्घकाळ पदांवर असलेल्यांना थांबण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात ‌‘आरएसएस‌’ने राज्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांच्या नियामक मंडळावर अधिकारवाणीने काम करणाऱ्या तसेच दोन ते तीन टर्म पूर्ण केलेल्या सदस्यांना थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, संघाशी एकनिष्ठ असलेल्या तरुण, तडफदार स्वयंसेवकांना कारभाराची संधी दिली आहे. त्यामुळे ‌‘आरएसएस‌’कडून शैक्षणिक संस्थांमध्ये परिवर्तन करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळी आदी पुण्यातील संस्थांसह राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या नियामक मंडळांवर वर्षानुवर्षे काही ठरावीक पदाधिकाऱ्यांनी पदभार सांभाळला आहे. परंतु, याला छेद देण्याचा निर्णय आता ‌‘आरएसएस‌’ने केल्याचे समजते. काही संस्थांच्या नियामक मंडळांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सध्या जाहीर झाला आहे, तर काहींचा भविष्यात होणार आहे. परंपरागत पद्धतीचा विचार केला, तर ‌‘आरएसएस‌’चे वर्चस्व असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये दोन पॅनेल उभे राहत असत आणि संबंधित संस्थांचे सदस्य मतदान करून एका पॅनेलची निवड करीत असत. परंतु, यातून संबंधित संस्थांवर वर्षानुवर्षे एकाच पॅनेलची सत्ता येत होती. यातून त्या पॅनेलप्रमुखाची त्या संस्थांवर मक्तेदारी होण्याचे प्रकार काही ठिकाणी होत होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत तसेच सर्वांना काम करण्याची समान संधी मिळावी, या दृष्टिकोनातून ‌‘आरएसएस‌’ने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात ‌‘आरएसएस‌’च्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारताना मानधनाची देखील अपेक्षा न करता केवळ सेवा म्हणून सदस्यांनी काम करावे आणि योग्यवेळी दुसऱ्यांना संधी द्यावी, अशी संघाची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र काही पदाधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे आता ‌‘आरएसएस‌’ने निवडणुकीच्या या प्रक्रियेने होणारी मक्तेदारी थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातून संघाशी एकनिष्ठ स्वयंसेवकांची नावे निश्चित करून त्या यादीतील मंडळींनाच नियामक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच, इतर कोणीही अर्ज भरणार नाही, याची खबरदारी घेत निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात येत आहे. हे करीत असताना आरएसएसशी एकनिष्ठ असलेल्या, कामाशी एकनिष्ठ , जबाबदारीने काम करणाऱ्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

संघाची कायम तरुणांना विविध ठिकाणी संधी देण्याची भूमिका राहिलेली आहे. देशपातळीवर देखील तरुणांनी कार्य करावे, यासाठी संघ प्रयत्नशील असतो. त्यामुळे महाविद्यालयांच्या नियामक मंडळांची जबाबदारी देखील आता तरुणांनी स्वीकारावी, याच हेतूने संबंधित संस्थांमध्ये परिवर्तन केले जात आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण पसरल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले.

‌‘शिक्षण प्रसारक मंडळी‌’ची निवडणूक बिनविरोध

‌‘शिक्षण प्रसारक मंडळी‌’च्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये 22 फेबुवारीला मतदान आणि 23 तारखेला निकाल घोषित करण्यात येणार होता. परंतु, मतदान होण्यापूर्वीच संबंधित निवडणूक बिनविरोध केली आहे. यामध्ये सामंजस्याने काही पदाधिकाऱ्यांना निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचे आदेश ‌‘आरएसएस‌’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. त्यांच्या विनंतीला मान देऊन काही जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे या संस्थेत नवीन नियामक मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा येत्या 23 तारखेला करण्यात येणार असल्याचे शिक्षण प्रसारक मंडळीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT