पुणे

पुणे : कामामध्ये चुका काढण्यापेक्षा ते पुढे घेऊन जा, निरोप समारंभात सीईओ आयुष प्रसाद यांचे सहकार्‍यांना आवाहन

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी कार्यक्रम आखला, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. चाळीस हजार कोटींच्या मालमत्तांची जबाबदारी महिलांकडे सोपवली. काही कामे पूर्णत्वास गेली तर काही आणखी अपूर्ण आहेत. त्यामध्ये खानवडी शाळा आणि कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांचे स्मारक अपूर्ण आहे. कामामध्ये चुका काढण्यापेक्षा ती कामे पुढे घेऊन जाण्याचे आवाहन अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेकडून निरोप समारंभाचे शनिवारी आयोजन केले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी सभापती बाबुराव वायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, डॉ. इंद्राणी मिश्रा आदी उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले, ग्रामपंचायतला कचरामुक्त करून दाखवायचे आहे, हे माझ्याकडून काम पूर्ण झाले नाही. जिल्हा परिषदेची सर्वाधिक बदनामी ही कचर्‍यामुळे होते. कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण राहिले. 42 कर्मचार्‍यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाले, ते माझ्या एका सहीने कामास गेले होते. कोरोनात त्यांनी इतरांचे जीव वाचवले. या कर्मचार्‍यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. त्या कर्मचार्‍यांच्या मृत्यूमुळे मला नेहमी दुःख होते.

आमच्या बाळाचा नवीन आयुष्य मिळाले…

सकाळी एक अनोळखी फोन आला. साहेब मी तुम्हाला ओळखत नाही, पण फोन नंबर मिळवून तुम्हाला फोन केला. मला किंवा आमच्या कुटुंबीयांना माहिती नव्हतं की आमच्या बाळाला हृदयाचा त्रास आहे. तुमच्यामुळे जिल्हा परिषदेकडून बाळांच्या झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये हृदयाचा आजार कळला आणि त्यावर तुमच्याकडून चांगल्या प्रकारे उपचार झाले, आयुष प्रसाद यांनी भाषणात फोनवर झालेला संवाद सांगितला.

शाळेसाठी एक दिवसाचे वेतन…

महात्मा जोतिबा फुले यांचे वास्तव्य राहिलेल्या खानवडी गावात मुलींची शाळा बांधून आगळे वेगळे स्मारक उभा केले. शाळेची इमारत उभी राहत आहे. या शाळेला निधी कमी पडू नये म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे, अशी विनंती आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना केली. 5 कोटी 15 लाख रुपयांचा एका दिवसाचे जिल्हा परिषदेचे वेतन आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT