उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाहणी दौरा  Pudhari
पुणे

Ajit Pawar: घरात पाणी घुसलेल्या कुटुंबांना १० हजारांची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

बारामती : मागील तीन-चार दिवसांत बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच भर म्हणून बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी (दि. २९) रोजीही त्यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी या गावासह अन्य गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्यांना १० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. बारामतीसह राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल! हे एका झटक्यात होणार नाही. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे. शक्य तेवढी मदत आम्ही करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींचा समावेश आहे. यादरम्यान शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT