पुणे

पुणे : रॉटव्हीलर श्वानाने घेतला निवृत्त एसीपींचा चावा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रहिवासी भागात ठेवणे कायद्याने बंदी असलेल्या रॉटव्हीलर जातीचा श्वान ठेऊन त्याला मोकळे सोडल्याने त्या श्वानाने माजी सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) यांचा व त्यांच्या श्वानाचा चावा घेतल्याचा प्रकार बाणेर येथील विरभद्र नगर मधील लेन नंबर तीन मधील सार्वजनिक रस्त्यावर घडला.

याप्रकरणी तुषार भगत आणि त्यांच्या वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर (रा. विरभद्र नगर, बाणेर) यांनी फिर्याद चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉटव्हीलर जातीचा श्वान रहीवासी भागात ठेवण्यास कायद्याने मनाई आहे. बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कलगुटकर हे त्यांच्या श्वानासोबत मॉर्निंग वॉक करत असताना फिर्यादी यांच्या भागात राहणार तुषार भगत हा त्याच्याजवळील रॉटव्हीलर श्वानाला घेऊन फिरण्यास आला होता. त्या श्वानापासून इतरांना धोका पोहचू शकतो हे माहिती असताना देखील त्याने त्याच्या श्वानाला मोकळे सोडले होते. ज्यावेळी फिर्यादी यांच्या जवळील श्वानाला पाहून रॉटव्हीलर श्वानाने त्यांच्या श्वानाला चावा घेतला तसेच तो श्वान फिर्यादी यांनाही चावल्याने ते गंभीर जखमी झाले. म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT