धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाला जोडणार्या त्रिमूर्ती चौक ते राजमाता भुयारी मार्गादरम्यान रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे काम रखडल्याने वाहनचालक व नागरिकांना कसरत करावी लागत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्रिमूर्ती चौक परिसरातील चंद्रभागानगर चौक ते राजमाता भुयारी मार्गादरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूचे काम चंद्रभागानगर ते तिरंगा चौकापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र, उजव्या बाजूचे काम कित्येक दिवसांपासून बंद आहे. डाव्या बाजूला मलनिस्सारण वाहिन्या आणि पावसाळी वाहिन्यांचे कामसुद्धा अर्धवटच आहे. गेल्या महिनाभरापासून हे काम बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या कामाचे खडी, ब्लॅक, पाइपसह इतर साहित्य रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. धनकवडीकडून कै. शिवाजीराव आहेर पाटील चौक ते त्रिमूर्ती चौक ते राजमाता भुयारी मार्ग या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, या रस्त्याचे काम रखडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ही अडथळ्याची शर्यत पार करणे सध्या नागरिकांना जिकिरीचे झाले आहे. तसेच सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी देखील होत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या रस्त्यावर मलवाहिन्या व पावसाळी वाहिन्या नव्याने टाकण्याचे नियोजन आहे. हे काम झाल्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केल्यानंतर हे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे मुख्य उपअभियंता दिलीप पांडकर यांनी सांगितले.
या रस्त्याचे काम अनेक दिवस रेंगाळलेले असून, परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
– शंतनू पेंढारकर, रहिवासी
हेही वाचा