बिबवेवाडी: बिबवेवाडी येथील अप्पर परिसरातील इंदिरानगर चौकात सोमवारी दुपारी अचानकपणे रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले. यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
इंदिरानगर चौक परिसरात कल्व्हर्टच्या कामामुळे रस्ता खचल्याचा अंदाज काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच इंदिरानगर चौकापासून संविधान चौकापर्यंतच्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण झाला आहे. या रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनचे चेंबर तयार करण्यात आले आहेत. (latest pune news)
चेंबर आणि रस्त्याचे काम अपरिपक्व असल्यामुळे या ठिकाणी भागदाड पडल्याचा अंदाजही काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी रस्ता खचल्याची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिली. मात्र सायंकाळपर्यंत त्यांनी दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
रहिवाशी रामविलास माहेश्वरी म्हणाले की, रस्ता खचल्याची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांना फोन लावले. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वाहतूक पोलिसांनी खचलेल्या रस्त्यावर बॉरिगेट लावून वाहतूक सुरू केली. महापालिकेने या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे या ठिकाणी रस्ता खचण्याचा प्रकार घडला आहे.
बिबवेवाडी परिसरातील इंदिरानगर चौकात रस्ता खचल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित ठेकेदाराकडून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात जाईल.- कमलेश नागेश्वर, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग, महापालिका