पुणे: पुणे महापालिकेच्या पथ विभागाने 2023 मध्ये जवळपास 300 कोटी रुपये खर्च करून 100 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार केले होते. या रस्त्यांना पाच वर्षांचा दोषदायित्व कालावधी (डीएलपी) ठेवण्यात आला होता.
मात्र, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज मंडळ, एमएनजीएल, बीएसएनएल तसेच खासगी केबल कंपन्यांच्या कामांसाठी झालेल्या रस्ते खोदाईमुळे हा कालावधी दोन वर्षांतच संपुष्टात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांची जबाबदारी संपली असून, आता या रस्ते दुरुस्तीचा संपूर्ण भार महापालिकेवर आला आहे. (Latest Pune News)
पुणे महानगरपालिकेमार्फत 2023 मध्ये शहरात विविध रस्ते तयार करण्यात आले. यात काही रस्ते डांबरी तर काही रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होते. 1 ते 5 पॅकेजमध्ये एकूण 100.78 किलोमीटर रस्त्यांची कामे महापालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आले. यासाठी तब्बल 300 कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने केला होता.
हे रस्ते तयार करतांना या निविदेमध्ये ज्या रस्त्यांवर खोदाई होणार नाही, त्यांनाच पाच वर्षांचा दोषदायित्व कालावधी लागू होईल, अशी अट होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या विविध विभागांपासून शासकीय संस्था व खासगी कंपन्यांकडून वारंवार खोदाई करण्यात आली.
त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे ठेकेदाराचे दायित्व आता संपुष्टात आले आहे. परिणामी, आता हे रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा पालिकेला खर्च करावा लागणार आहे. खोदाईनंतर महापालिकेने पॅचवर्क केले असले तरी ते मूळ रस्त्याशी एकरूप झाले नाहीत. वरवरची मलमपट्टी केल्याने रस्ते पुन्हा उखडून खड्डे तयार झाले आहेत.
निमित्त ‘पुणे ग्रँण्ड चॅलेंज’चे अन् रस्त्यासाठी पुन्हा 145 कोटींचा खर्च
‘पुणे ग्रँण्ड चॅलेंज 2026’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी 145 कोटी रुपये खर्च करून पुन्हा 75 किमी रस्त्यांचे नूतनीकरण पुढील दोन महिन्यात केले जाणार आहे. या कामांसाठी महापालिकेने 10 वर्षांचा दोषदायित्व कालावधी ठेवला आहे. मात्र, मागील अनुभव पाहता हे रस्ते खोदाईमुळे पुन्हा या वेळी खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच दोषदायित्व कालावधीदेखील यामुळे जर संपला तर पुन्हा या रस्त्यांची दुरुस्ती कारणासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे.
जबाबदारीतून ठेकेदार झाले मुक्त
पुणे महापालिकेच्या पथ विभागाने 2023 मध्ये सुमारे 100 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले. या रस्त्यासाठी पाच वर्ष दोषदायित्व असतांना हा कालावधी संपण्याच्या आधीच या रस्त्यावर पालिकेच्या पाणी पुरवठा, ड्रेनेज यासह अन्य विभागासह केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग, खाजगी केबल कंपन्यांनी विविध कामासाठी रस्त्याची खोदाई केली. परिणामी, या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करण्याच्या जबाबदारीतून संबंधित ठेकेदार मुक्त झाले आहेत.
अधिकाऱ्यांचा कबुलीजबाब “महापालिकेने 2023 मध्ये 1 ते 5 पॅकेज अंतर्गत रस्त्यांची कामे केली होती. पण त्या रस्त्यांवर खोदाई झाली. त्यामुळे एकाही रस्त्याचा दोषदायित्व कालावधी राहिलेला नाही.”-अनिरुद्ध पावसकर, विभाग प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका