पुणे

कार्ला : इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ

अमृता चौगुले

कार्ला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात कोसळणार्‍या वरुणराजाने बुधवारी (दि. 26) आपला जोर कायम ठेवत तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. पावसामुळे परिसरातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

डोंगर, दर्‍यांतून धबधबे कोसळू लागले असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आंदर मावळ, पवन मावळ तसेच नाणे मावळात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसामुळे मावळातील भात खाचरेदेखील तुडुंब झाली आहेत. जोराचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

लोणावळा, कार्ला परिसरात कोसळणार्‍या पावसाने इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कार्ला, सदापूर, पाथरगाव, कामशेत भागात नदीचे पाणी पात्राबाहेरून वाहत आहे. परिसरातील ओढेदेखील खळाळून वाहू लागले आहेत. खळाळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांचीदेखील पावले मावळात वळत आहेत. हवामान खात्याने येत्या चोवीस तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी तसेच इतरही नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT