पुणे

राज्यातील कोंबड्यांची दक्षिणेकडे स्वारी

Laxman Dhenge

पुणे : उन्हाच्या चटक्याने पक्ष्यांच्या वाढीवर झालेला परिणाम अन् वाढलेले दर यामुळे हैदराबाद, तेलंगणातील कोंबड्या खरेदीदारांनी दक्षिणेच्या तुलनेने वजनदार व स्वस्त कोंबड्या मिळणार्‍या महाराष्ट्राकडे मोर्चा वळविला आहे. परराज्यांतून खरेदी वाढल्याने पुण्याच्या बाजारात कमी प्रमाणात कोंबड्या उपलब्ध होत असल्याने चिकनचे दर तेजीकडे झुकले आहेत. शहरात मागील दहा दिवसांत चिकनच्या किलोमागे 30 रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात चिकनची 230 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

उन्हाळ्यात पक्ष्यांना खाद्य कमी, मात्र पाणी जास्त लागते. पुरेसे खाद्य न खाल्ल्याने पक्ष्यांची वाढ होत नाही. त्यामुळे ते वजनाला कमी भरल्याने उत्पादनातही घट होत असते. दक्षिणेतील राज्यांमध्ये सध्या उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने कोंबड्यांच्या आकारावर परिणाम झाला असून, त्यांच्या वाढीचा काळही लांबला आहे. जो पक्षी 37 ते 38 दिवसांत तयार होतो, तो 42 दिवसांवर गेल्याने उत्पादनाचे गणित बिघडले आहे. त्यातुलनेत, राज्यात तशी परिस्थिती उद्भवलेली नाही.

याउलट राज्यात सध्या वजनदार कोंबड्या उपलब्ध आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्ष्यांच्या किलोला 120 रुपये भाव मिळत आहे, तर महाराष्ट्रात 112 रुपये किलोने पक्षी उपलब्ध आहेत. राज्यातील कोंबड्या दक्षिणेच्या तुलनेत किलोमागे 8 ते 10 रुपयांनी स्वस्त, तसेच वजनाने अधिक असून, खरेदीदारांसाठी त्या फायदेशीर ठरत असल्याने सध्या मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडील राज्यांतून कोंबड्यांची खरेदी वाढली आहे. मात्र, त्याचा परिणाम शहरातील बाजारावर झाला असून, चिकनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

परराज्यांतून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. पुढील दहा ते पंधरा दिवस हीच परिस्थिती कायम राहील. यादरम्यान दर 240 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परराज्यांच्या तुलनेत राज्यातील कोंबड्यांची दरवाढ झाल्यास परराज्यांतून होणारी खरेदीही थांबेल, अशी शक्यता आहे.

– रूपेश परदेशी, संचालक, पुणे शहर बॉयलर असोसिएशन.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT